लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रस्ता अपघातांमध्ये दुचाकीच्या मागे बसलेल्या ७ जणांचा २० दिवसांत मृत्यू झाला आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता दुचाकींच्या मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती केली जाईल, असे वाहतूक पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांची राज्यातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यात सदर विषयावरही चर्चा झाली. त्यानुसार दुचाकींच्या मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती करण्याचा ठराव घेण्यात आला. प्रत्येकाचा जीव अनमोल आहे. त्यादृष्टीने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अधीक्षक सिल्वा म्हणाले, की मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी चालकांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे आहे. त्यानुसार दुचाकीचालक हेल्मेट घालतात. याला काही अपवाद असतीलही. त्याविरोधात कारवाई केलीही जात आहे.
मात्र, त्याचबरोबर मोटार वाहन कायद्याने दुचाकींच्या मागे बसणाऱ्यांना हेल्मेट परिधान करण्याची तरतूद आहे. मात्र, गोव्यात त्याचे पालन फारसे होत नसल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांत पंचवाडी, वाळपई आदी काही भागांमध्ये झालेल्या रस्ता अपघातांमध्ये दुचाकींच्या मागे बसणाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. हेल्मेट न घातल्याने डोक्याला मार बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
अंतर्गत मार्गांवरही सक्ती
सुरुवातीला नागरिकांमध्ये जागृती करून हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन केले जाईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरु होईल. महामार्गच नव्हे तर राज्यातील अंतर्गत रस्त्यांवरही ही सक्ती असेल. कारण अशा रस्त्यांवरही अपघात घडतात, असे पोलिस अधीक्षक सिल्वा यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"