पणजी : मंगळवारी रात्री कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांबरोबच भातपिकाचीही हानी झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे फळे झडून पडण्याच्या घटना घडल्या असून बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. सलग दोन ते तीन दिवस पाऊस कोसळल्यास झाडावरील फळे कुजण्याची शक्यता आहे.कृषी संचालक ओर्लांदो रॉड्रिग्स यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, विभागीय कृषी अधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यास सांगितले असून पुढील आठवड्यात सर्वेक्षण अहवाल प्राप्त होईल. केपे, सांगे, सासष्टी, फोंडा, सत्तरी आदी तालुक्यांमध्ये वायंगण शेती केली जाते. हे भातपीक कापण्यासाठी तयार असताना पावसामुळे आडवे झाल्याने कुजण्याचा धोका आहे. तयार झालेला दाणा कुजू शकतो, असे एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याने सांगितले. ५0 टक्के आंबे अजून झाडावर आहेत. वादळी वाऱ्यामुळे बागायतींमध्ये फळे झडून पडण्याचे प्रकारही काही ठिकाणी घडलेले आहेत. काजूच्या बाबतीतही हाच प्रकार घडलेला आहे. मात्र, एकदा कोसळलेल्या पावसाने झाडावरील फळाला फारशी हानी पोहोचणार नाही; उलट बहर आलेला असल्यास फळ धरण्यास हा पाऊस उपयुक्त ठरेल, असा दावाही अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. ७५ टक्के काजू काढलेले असून केवळ २५ टक्के पीक झाडावर आहे.(प्रतिनिधी)