पणजी - गोव्यातील सरकारी कोकणी अकादमीकडून दिल्या जाणा-या साहित्य आणि भाषा सेवा पुरस्कार प्रक्रियेबाबत गोव्यात यावेळी प्रथमच मोठा वाद झाला. परिणामी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी साहित्यिक सर्जिकल स्ट्राईक करून आता सगळे 32 पुरस्कार रद्द ठरविले आहेत. यात साहित्यिक विष्णू वाघ यांच्याही पुस्तकाचा प्रस्तावित पुरस्कार रद्दबातल ठरला आहे.
गोव्यात 1987 साली कोकणी राज्यभाषा व मराठी ही सहभाषा झाली. सरकारने त्यावेळी कोकणी अकादमी ही संस्था सुरू केली व साहित्य आणि भाषा सेवा पुरस्कार देणे सुरू केले. एकूण आठ साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार देण्यात येतात. यंदा प्रथमच विष्णू वाघ यांच्या सुदिरसुक्त ह्या कोकणी काव्यसंग्रहावरून मोठा वाद निर्माण झाला. या कवितासंग्रहात सारस्वत समाजाविषयी द्वेष आणि अत्यंत अश्लील शब्दप्रयोग आहेत असा आक्षेप घेऊन कोकणी साहित्यप्रेमीनी मोठा विरोध केला. काही कोकणीप्रेमी व मराठीप्रेमीनी मात्र वाघ यांच्या लेखनाचे समर्थन केले. शेवटी वादामुळे गोवा कोकणी अकादमीने सर्व 32 पुरस्कार निवडीविषयी सरकारनेच काय तो निर्णय घ्यावा या हेतूने फाईल मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे पाठवली. पर्रीकर यानी आता सगळी निवड प्रक्रिया कशी सदोष आहे ते दाखवून देणारे शेरे फाईलवर मारले आणि सगळे 32 पुरस्कार रद्द ठरविले. कोकणी अकादमीच्या एका समितीने या पुरस्कारांसाठी लेखक व कार्यकर्ते यांची निवड केली होती. एका कवितासंग्रहावरून निर्माण झालेल्या वादात सगळे पुरस्कार सरकारने रद्द ठरविण्याची ही गोव्याच्या साहित्य क्षेत्रातील पहिलीच घटना आहे.