पणजी- राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले असल्याने मी देखील राहुलजींचे अभिनंदन करतो. जरी राहुल गांधी अध्यक्ष बनल्याने घराणेशाहीचे एक सर्कल पूर्ण झालेले असले तरी ही एक मोठी घटना असून आपण अभिनंदन करण्याच्या प्रक्रियेत त्यामुळेच सहभागी होतो, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले.
राहुल गांधी यांचे अभिनंदन करणारा ठराव विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व अन्य काँग्रेस आमदारांनी मिळून विधानसभेत मांडला होता. आपणही काँग्रेस आमदारांच्या या ठरावाला पाठींबा देतो असे मनोहर पर्रीकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी घराणेशाहीचे वर्तुळ पूर्ण झाले, असा उल्लेख केला तेव्हा काँग्रेसच्या आमदारांच्या चेहर्यावरील भाव बदलले. मात्र भाजपाच्या काही आमदारांच्या चेहर्यावर हास्याची सूक्ष्म छटा उमटली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनीही गांधी यांचे अभिनंदन केले. गांधी कुटूंबाने देशाची सेवा केली व देशासाठी खूप त्याग केला असल्याचेही आलेमाव म्हणाले.
काँग्रेसचे आमदार रवी नाईक, इजिदोर फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, नीलकंठ हळर्णकर, दिगंबर कामत आदींनी गांधी याचे अभिनंदन करणारी भाषणे केली व राहुलजींना भेटल्यानंतर त्याना आलेले काही अनुभवही सांगितले. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाचा त्याग केला होता. राहुल गांधी यांनीही यापूर्वी मंत्रीपद स्वीकारले नाही. आता प्रतिकूल स्थितीत त्यानी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. काँग्रेसला ते गतवैभव मिळवून देतील असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, सुभाष शिरोडकर आदी म्हणाले.