सदगुरू पाटील
पणजी - गोव्यात नेतृत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी मध्यरात्री दाखल झाले तरी, भाजपप्रणीत आघाडीचे घटक पक्ष ऐकत नसल्याने गडकरी गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण ते ठरवू शकले नाहीत. यामुळेच पेचप्रसंग निर्माण झाला असून गोवा विधानसभा दोन महिन्यांसाठी निलंबित ठेवली जाऊ शकते, अशी चर्चा गोवा भाजपच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गडकरी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गोव्यात पाठवले. रविवारी रात्री साडेबारानंतर गडकरी दाखल झाले. त्यांनी पणजीपासून जवळच असलेल्या दोनापावल येथील एका हॉटेलमध्ये भाजपच्या आमदारांशी चर्चा केली. भाजपचे संघटन मंत्री सतिश धोंड यांनी डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचविले. सावंत हे भाजपचे आमदार असून ते गोवा विधानसभेचे सभापती आहेत. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे गडकरी यांना भाजपप्रणीत आघाडीचे घटक असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक या दोन पक्षांसोबत चर्चा करावी लागली. प्रमोद सावंत यांचे नेतृत्व स्वीकारण्यास भाजपचेही दोन आमदार तयार नाहीत आणि गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर हेही तयार नाहीत. ढवळीकर यांनी मुख्यमंत्रीपद आपल्याकडे सोपवावी अशी विनंती गडकरी यांना केली. विजय सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्रीपद आपल्याला दिले जावे, असा प्रस्ताव मांडला. गडकरी यांनी ते मान्य केले नाही. मुख्यमंत्रीपद दुसऱ्या पक्षाला दिले तर मग सरकार घटक पक्षांचेच होईल असे भाजपच्या कोअर टीमनेही नितीन गडकरींना सांगितले.
नेतृत्वाचा तिढा सुटण्याची आशा भाजपच्या अनेक आमदारांनी सोडली आहे. गोवा विधानसभेचे चार मतदारसंघ रिकामे झाले आहेत. तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक आहे. त्या पोटनिवडणुकीचा निकाल लागेपर्यंत गोवा विधानसभा निलंबित ठेवली जाऊ शकते. गोव्यात सध्या सरकारच नाही.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी अनेक नेते सोमवारी (18 मार्च) दुपारी गोव्यात दाखल होणार आहेत. पर्रीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी ते येत आहेत.