म्हापसा - मूळ म्हापसावासी तसेच गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांना आदरांजली वाहण्यासाठी म्हापशातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. यात बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसोबत बाजारपेठेला लागून असलेल्या इतरही व्यापारी स्वखूशीने त्यात सहभागी झाले होते.
ज्या शहरात पर्रीकरांची जडण घडण झाली ज्या शहराशी तसेच शहरातील नागरिकांशी त्यांचा बालपणापासून जवळचा सलोख्याचा संबंध आला. ज्या म्हापसा शहरात त्यांचे बालपणापासून ते कॉलेज शिक्षणापर्यंतचा काळ गेला. त्या शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या आदरापायी उत्तर गोव्यातील सर्वात मोठी बाजारपेठ बंद ठेवून त्यांच्या प्रती असलेला आदर व्यक्त केला.
कॉलेजचे शिक्षण म्हापशातील झेवियर कॉलेजात पूर्ण केल्यानंतर आयआयआयटीचे शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईतील पवई येथे गेले. काही वर्षे घालवल्यानंतर शिक्षण पूर्ण करुन पुन्हा या शहरात आले. सुरुवातीला काही काळ आपला व्यवसायही या शहरातूनच थाटला. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा आरुढ झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे सुद्धा ते म्हापशात रहात होते. मुख्यमंत्री असून सुद्धा म्हापशातील घरातून आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी स्वत: स्कूटरवरुन सुद्धा जात होते. शहरातील बहुतेक व्यक्तींशी त्यांचे हितसंबंध होते. त्यांना ते स्वत: नावाने सुद्धा ओळखत. त्यांच्या बरोबरीचे अनेक लोक त्यांना भाई या नावाने हाक न मारता मनोहर या नावाने सुद्धा हाक मारीत असे. शहरातील सार्वजनीकरित्या होणाऱ्या धार्मिक कार्यांना त्यांची आवर्जुन उपस्थिती असायची.
पर्रीकरांचे कनिष्ठ बंधू सुरेश पर्रीकर यांचे म्हापशातील बाजारपेठेत दुकान सुद्धा आहे. पूर्वी पर्रीकरांचे वडील स्व. गोपाळकृष्ण पर्रीकर ते दुकान चालवत असत. त्यानंतर काही काळ खुद्द पर्रीकर सुद्धा दुकानावर राहून तेथील व्यवहारात पाहिले आहेत. मुंबईत शिक्षण पूर्ण करुन पुन्हा आल्यानंतर सुद्धा अप्रत्यक्षपणे त्यांचा वायवसायाशी संबंध होता.
पर्रीकरांना आदरांजली वाहण्यासाठी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी दिली. ज्याने सामान्य व्यक्तीपासून ते संरक्षण मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला त्यांनी दिलेल्या योगदानासाठी बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले. संघटनेचे उपाध्यक्ष नरेश तिवरेकर यांनी यावेळी बोलताना त्यांनी केलेले कार्य शब्दात वर्णन करण्यासारखे नसल्याचे सांगितले. त्यांच्या कार्याच्या व योगदाना प्रित्यर्थ बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले. महम्मद मोतीवाला यांनी सुद्धा पर्रीकरांच्या कार्याची स्तुती करताना कर्तव्यापायी बंद पाळण्यात आल्याचे सांगितले.