पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (17 मार्च) संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. पर्रीकरांच्या निधनानंतर गोव्यामधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोवा प्रदेश काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर आणि चंद्रकांत कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. भाजपानेही नव्या मुख्यमंत्र्याचा शोध घेण्यासाठी रात्रभर आमदारांसोबत बैठका घेतल्या. या बैठकीला मित्र पक्ष आणि काही अपक्ष आमदारही उपस्थित होते.
काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी मध्यरात्री गोव्यामध्ये दाखल झाले. गडकरींच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक पार पडली. पहाटेपर्यंत या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी पक्षाच्या आमदारांसह नितीन गडकरींची भेट घेतली आहे.
गोवा विधानसभा सभापती प्रमोद सावंत यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सध्या आघाडीवर आहे. श्रीपाद नाईक यांचंही नाव चर्चेत होतं मात्र भाजपाच्या मित्रपक्षांचा नाईक यांना विरोध आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यांनी आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटलं आहे. 'आम्ही मनोहर पर्रीकर यांना समर्थन दिलं होतं भाजपाला नाही, पर्रीकरांच्या निधनानंतर भाजपा आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करू' असं सरदेसाई यांनी सांगितलं.
मगोपचे सुदीन ढवळीकर यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. मगोपने सत्तास्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा दिला होता. 'आम्ही बऱ्याचदा भाजपाला पाठिंबा दिला आहे. आता भाजपाने आम्हाला मुख्यमंत्रीपदावर संधी द्यावी', अशी मागणी मगोपने केल्याचे विधानसभेतील उपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले.
गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार असून, त्यात गोवा फॉरवर्ड पक्ष, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. या पक्षांनी केवळ पर्रीकर यांच्यासाठीच सरकारला पाठिंबा दिला आहे. आता पर्रीकर यांच्या निधनामुळे हे पक्ष कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे देशभर हळहळ; कर्करोगाशी झुंज अयशस्वी
गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंंधित कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या मागे दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाध्यक्ष अमित शहा, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.