पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे त्यांच्या क्षमतेवर विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असतानाच पर्रीकर यांनी आज दुपारी मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाच्या बांधकामस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सुमारे तासभर ते या पुलावर होते. या पुलावर आतापर्यंत ४५0 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून ९५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. येत्या १२ जानेवारी रोजी उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे.
पर्रीकर यांच्या या भेटीबाबत अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. साधन सुविधा विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संदीप चोडणेकर व निवडक अधिकारी तसेच लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीचे अभियंते यावेळी उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २८ ते ३0 डिसेंबरपर्यंत मडगांव ते म्हापसा आणि परत अशी थेट वाहतूक या पुलावरुन करता येईल एवढे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. फोंडा रॅम्प सोडून उर्वरित काम या मुदतीत पूर्ण करण्याच्यादृष्टिने वेगाने काम सुरु आहे. मांडवी नदीवर उभारण्यात येत असलेल्या या तिसºया पुलावरून डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या प्रारंभास म्हापसा ते मडगाव अशी वाहतूक सुरू होईल. वाहतूक सुरू झाल्यानंतरच फोंड्याच्या बाजूने पुलाचे काम पूर्ण करता येईल. तिसरा पूल वगळता अन्य दोन मांडवी पुलांवरून फक्त पणजी व परिसरातील स्थानिक वाहतूक जाईल.
या पुलाच्या उद्घाटनाची तारीख अजून अधिकृतरित्या जाहीर व्हायची आहे. प्राप्त माहितीनुसार येत्या १२ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा विचार आहे. आजारी असलेले मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाच्या बांधकामाची पाहणी करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती.