पणजी - प्लास्टिकचे आच्छादन घातलेले पुष्पगुच्छ स्वीकारणं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आता पूर्णपणे बंद केले आहे. 'मी अशा प्रकारचे पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही', असे आता मुख्यमंत्री थेट सार्वजनिक सोहळ्यांवेळी व्यासपीठावरून सांगू लागले आहेत. आयोजक पुष्पगुच्छ घेऊन येतात आणि मुख्यमंत्री थेट सांगून टाकतात, की मी स्वीकारत नाही. यामुळे मग आयोजकांचा ऐनवेळी गोंधळ उडतो.
शिरोडा अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या बाणावली येथील शाखेच्या उद्घाटनावेळीही तसाच अनुभव आला. मुख्यमंत्री उद्घाटनासाठी आले होते. आयोजकांनी मुख्यमंत्र्यांचे शब्दांनी स्वागत केले व मग आकर्षक पुष्पगुच्छ आणला. हा पुष्पगुच्छ प्लास्टिकच्या आच्छादनामध्ये गुंडाळलेला होता. मी स्वीकारणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगून प्लास्टिक बंदी पूर्णपणे अंमलात आणणं हा आपला हेतू असल्याचे स्पष्ट केले.
मी प्लास्टिक पिशव्यादेखील वापरणं बंद केले आहे. प्लास्टिकच्या कच-यामुळे राज्यात कचरा व्यवस्थापनाची समस्या अधिक जटील बनत आहे. लोकांनीही प्लॅस्टीकचा मुळीच वापर करू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पणजीत नुकतेच पत्रकारांशी बोलतानाही पर्रीकर यांनी स्पष्ट केले की, आपण जेव्हा मंदिरांमध्ये जातो, तेव्हा तेथील पुजारी आपल्याला आता कागदातूनच प्रसाद देतात. कारण मी प्लास्टिकच्या पिशवीतून दिलेला प्रसाद घेत नाही हे सर्वांनाच समजले आहे. पूर्वी मला मंदिरांमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमधून प्रसाद दिला जात असे. मी प्लास्टिक वापरू नका असा सल्ला दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, की प्लास्टिक बंदीची सवय अंगवळणी पडण्यासाठी लोकांना थोडा वेळ लागेल. मला स्वत:लाच पाच ते सहा महिने लागले. कोणतीही वाईट सवय थांबविण्यासाठी प्रत्येकाला वेळ लागतोच. वेळ द्यावा लागेल.
दरम्यान, यापुढील काळात राज्यात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठी असलेल्या दंडाच्या प्रमाणात वाढ करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पणजी मार्केट प्रकल्पात व्यापा-यांनी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणो काही प्रमाणात बंद केले आहे. त्यांच्याविरोधात महापालिकेनेही अलिकडे सातत्याने कारवाई केली आहे. पूर्ण वापर थांबलेला नाही पण प्रमाण कमी झाले आहे. सरकारी सोहळ्यांमध्ये चहा देण्यासाठी प्लास्टिकचे कप, प्लास्टिक फुलांचे पुष्पगुच्छ व अन्य प्लास्टिक वापरू नका अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सर्व सरकारी खात्यांना केल्या आहेत.