पणजी : मुंबईच्या इस्पितळात उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारपर्यंत गोव्यात दाखल होणार आहेत. मुख्यमंत्र्यांची स्थिती आता सुधारली आहे. मुंबईच्या लिलावती इस्पितळात मुख्यमंत्री दाखल झाले होते. अमेरिकेहून उपचार घेऊन गेल्या बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री गोव्यात परतले होते. तथापि, गुरुवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने व उलटीही आल्याने मुंबईला जावे लागले होते. तिथे काही चाचण्याही करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी गेले काही दिवस मुंबईत उपचार घेतले व त्यांची प्रकृती सुधारली आहे. ते बुधवारपर्यंत गोव्यात परततील. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेही पर्रीकर बुधवारपर्यंत गोव्यात असतील असे सोमवारी स्पष्ट केले.
पर्रीकर गोव्याबाहेर असल्याने प्रशासनावर परिणाम झाला आहे, काय असे पत्रकारांनी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई यांना विचारले असता, ते म्हणाले की परिणाम हा होणारच. त्याविषयी शंका नाही. मात्र हा आरोग्याचा विषय असल्याने गोमंतकीयांनी समजून घ्यायला हवे व गोमंतकीय ते समजून घेत आहेत. हा विषय काही मुख्यमंत्र्यांच्या हाती नाही. कधी कुणाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ते सांगता येत नाही. कारण आम्ही काही देव नव्हे.
मंत्री सरदेसाई म्हणाले, की मुख्यमंत्री गोव्यात नसल्याने त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनावर परिणाम झाला तरी, मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांकडे बरेच अधिकार सोपवून परिणामांचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे जास्त नुकसान होत नाही. मुख्यमंत्री काही स्वत:च्या आवडीने गोव्याबाहेर गेलेले नाहीत. दुसरे मंत्रीही त्याचवेळी आजारी झाले पण त्याला पर्याय नाही. कारण माणसांचे आरोग्य हे शेवटी देवाच्या हाती असते. मुख्यमंत्री र्पीकर यांना मी नुकताच भेटून आलो आहे. मी विदेशात होतो पण परत येताना मी त्यांना भेटलो. ते उद्या-परवा गोव्यात येणार आहेत.
मंत्री सरदेसाई यांनी यावेळी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला. काँग्रेसकडून जीसीए व अन्य संघटनांवर टीका केली जाते. काँग्रेसचा विधिमंडळ पक्ष मात्र काहीच बोलत नाही. विधिमंडळ पक्षाने गेल्या विधानसभा अधिवेशनात काहीच कामगिरी केली नाही. काँग्रेसने खेळात राजकारण आणू नये.