मुंबई: गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्राणज्योत काल मालवली. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाशी दोन हात करत होते. या काळात त्यांना उपचारांसाठी लिलावती रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यावेळी सर्जिकल ऑन्कॉलजी विभागाचे चेअरमन डॉ. पी. जगन्नाथ यांनी त्यांच्यावर उपचार केले होते. जगन्नाथ यांनी पर्रीकरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पर्रीकरांच्या आठवणी सांगताना ते अतिशय भावुक झाले. जगन्नाथ यांनी 15 फेब्रुवारी 2018 ची आठवण सांगितली. 'एका व्हीव्हीआयपीला गोव्याहून लिलावती रुग्णालयात आणणार असल्याची माहिती मला देण्यात आली. त्या व्यक्तीला पोटदुखीची समस्या होती आणि स्वादुपिंडासंबंधी काही आजार झाला असावा, अशी शक्यता होती. व्हीव्हीआयपी असल्यानं रुग्णालयात पूर्ण तयारी करण्यात आली. यानंतर एक व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू होतं. ती व्यक्ती म्हणजे मनोहर पर्रीकर,' अशी आठवण जगन्नाथ यांनी सांगितली. 'ते अतिशय ताजेतवाने दिसत होते. ते आजारी आहेत, असं कोणीही म्हणू शकणार नाही, इतकी ऊर्जा त्यांच्यात होती. संध्याकाळी त्यांचे रिपोर्ट्स पाहून मला वाईट वाटलं. त्यांच्या स्वादुपिंडाला काही जखमा होत्या,' असं जगन्नाथ यांनी सांगितलं. 'माझ्या मनात त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. ते गोव्याचे मुख्यमंत्री होते, देशाचे संरक्षणमंत्री होते, यामुळेच त्यांच्याविषयी आदराची भावना नव्हती. ते अतिशय प्रामाणिक, मेहनती लोकनेते असल्यानं त्यांच्याविषयी प्रचंड आदर वाटतो. त्यांच्यासारखी नैतिकता जपणारा नेता होणं खूप कठीण आहे,' अशा शब्दांमध्ये जगन्नाथ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
त्यावेळीही पर्रीकरांचं हसू कायम होतं; डॉक्टरांनी सांगितली हृद्य आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:35 PM