पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना नियमितपणे बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयामधून आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याच माहिती मिळत आहे. पर्रीकरांचे नुकतेच गोमेकॉ रुग्णालयात सिटी स्कॅन केले गेले.
पर्रीकर हे दिल्लीतील एम्स रुग्णालयातून ऑक्टोबरमध्ये उपचार घेऊन आल्यापासून आपल्या खासगी निवासस्थानीच आहेत. करंजाळे येथील आपल्या निवासस्थानाच्या बाहेर ते गेलेले नाहीत. फक्त दोन दिवसांपूर्वी पर्रीकर गोमेकॉ रुग्णालयात जाऊन तपासणी करून आले. पर्रीकर घरात फिरतात पण ते पर्वरीतील सचिवालय तथा मंत्रलयात येऊ शकत नाहीत. पर्रीकर शरीराने अशक्त झालेले आहेत पण एरव्ही ते अधिकाऱ्यांशी वगैरे फोनवर बोलतात. काही मंत्री, आमदार त्यांना अधूनमधून भेटू पाहतात पण भेटी मिळत नाहीत. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी परवा शुक्रवारी आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी असा विचार केला होता पण नंतर तो विचार बदलला.
गोव्याचे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर व मुख्य सचिव धमेंद्र शर्मा हे विदेश दौऱ्यावर जात असल्यानेही मंत्रिमंडळ बैठक होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी असा विचार प्रथम पुढे आला होता पण गुरुवारी आपण शहर व ग्राम नियोजन मंडळाची बैठक ठेवलेली असल्याने त्या दिवशी मंत्रिमंडळ बैठक घेऊ नका, असे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यामुळे गुरुवारीही मंत्रिमंडळ बैठक होणार नाही. मुख्यमंत्र्यांना अमेरिकेतील डॉक्टरांनी व एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी जसा सल्ला दिलेला आहे, त्यानुसार गोव्यातील डॉक्टर्स त्यांच्यावर घरीच उपचार करत आहेत. त्यांच्या घरीही काही वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. डॉक्टरही सातत्याने तिथे भेट देत असतात.