पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) अजूनही उपचार सुरूच आहेत. मुख्यमंत्र्यांना गोमेकॉतून डिस्चार्ज कधी द्यावा याविषयी अजून कोणताही निर्णय डॉक्टरांनी घेतलेला नाही. पर्रीकर यांची प्रकृती सुधारत आहे पण डिस्चार्जविषयी अजून स्पष्टता आलेली नाही. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी (27 फेब्रुवारी) सकाळी गोमेकॉ इस्पितळाला भेट दिली व काही विषयांबाबत डॉक्टरांशीही चर्चा केली.
पर्रीकर यांना गोमेकॉ इस्पितळात गेल्या रविवारी (25 फेब्रुवारी) रात्री आणण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डिहायड्रेशन आणि रक्तदाब कमी झाल्यामुळे पर्रीकर यांना त्रास होऊ लागला होता व त्यामुळे त्यांना गोमेकॉत आणणे भाग होते. भाजपाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि खासदार नरेंद्र सावईकर यांनीही गोमेकॉ इस्पितळाला भेट देऊन पर्रीकर यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करून घेतली. कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनीही पर्रीकर यांच्याशी संपर्क साधून तब्येतीविषयी माहिती जाणून घेतली.
पर्रीकर यांच्या सुधारत असलेल्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी समाधान व्यक्त केल्याचे भाजपाच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपाच्या कोअर टीमची बैठक सोमवारी रात्री पार पडली. त्यावेळीही पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पर्रीकर यांना विश्रांतीची गरज आहे याची कल्पना सर्वानाच आलेली आहे. पर्रीकर हे मधुमेही आहेत. तथापि, त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आता नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पर्रीकर यानी विश्रांती न घेता धावपळ सुरूच ठेवणे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नाही याची कल्पना पर्रीकर यांना त्यांच्या काही हितचिंतकांनी दिलेली आहे.
सरकारमधील काही मंत्री, आमदार, भाजपाप्रणीत आघाडीचे घटक पक्ष यांचे लक्ष पर्रीकर यांच्या स्थितीवर व सध्याच्या राजकीय हालचालींवर देखील आहे. पर्रीकर हे गेल्या गुरुवारी अचानक विधानसभेत आले व त्यांनी सहा मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण केले. पर्रीकर यांच्यावर ज्या पद्धतीचे उपचार सुरू आहेत ते पाहता त्यांनी लोकांच्या संपर्कात येणे टाळायला हवे, कारण इनफेक्शन होऊ न देणो हे हिताचे आहे, अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रत व र्पीकर यांच्या आसपास वावरणा-या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. पर्रीकर यांनी मुंबईच्या लिलावती इस्पितळामधून गेल्या गुरुवारी डिस्चार्ज मिळवून लगेच गोव्यात येणो व विधानसभेत प्रवेश करणो हे आरोग्याच्यादृष्टीने धोक्याचे होते असे अजुनही मंत्री व आमदारांमध्ये बोलले जात आहे. दरम्यान, पर्रीकरयांच्या आरोग्याविषयी अफवा ह्या अकारण आहेत, असे मंत्री सरदेसाई यांनी म्हटले आहे.