सुभाष वेलिंगकर
मुक्त गोमंतकाचे भाग्यविधाते, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची ५०वी पुण्यतिथी दि. १२ ऑगस्ट रोजी आहे, त्या निमित्ताने शासकीय पातळीवर ही पुण्यतिथी गोवा सरकारने साजरी करावी, अशी माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी केलेल्या रास्त मागणीला आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत. तसेच भाऊसाहेबांच्या मिरामार येथील जुन्या झालेल्या समाधीला पूर्ण न्याय सरकारने द्यावा व आश्वासन पाळावे.
भाऊसाहेबांच्या समाधीचे यथायोग्य नूतनीकरण, विस्तारीकरण व सौंदर्यीकरण करण्यासाठीच्या योजनेचे ठोस वेळापत्रक व योजनेचा तपशील येत्या पुण्यतिथीनिमित्ताने सरकारने जाहीर करावा व कार्यवाहीचा प्रारंभ करावा.
पर्रीकर यांच्या कार्यकाळात कांपाल येथे असलेले दयानंद बांदोडकर फुटबॉल मैदान काढून टाकून तिथे पार्किंग व्यवस्था केली होती. कांपालच्या परिसरात मोकळ्या जागी आता सरकारने भाऊसाहेबांच्या मैदानस्मारकाचे पुनरुत्थान करावे, अशी मागणी त्यांनी केली. गोमंतकीयांचा भाऊसाहेबांच्या प्रती असलेल्या आदराच्या भावनेतून केलेल्या उपरोक्त माफक मागण्यांची पूर्तता भाजप सरकारने भाऊसाहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने करावी.
मुख्यमंत्री सावंत यांनी आश्वासन पाळावे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हल्लीच स्व. भाऊसाहेबांच्या समाधीचे यथायोग्य नूतनीकरण व सुशोभीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे. त्या घोषणेला मूर्त स्वरूप देण्याची स्व. भाऊसाहेबांच्या ५० व्या पुण्यतिथीची संधी मुख्यमंत्र्यांनी साधावी आणि योजनेचा शुभारंभ त्या दिवशी करावा
दोन दिवसच खुले, अन्यथा कडीकुलपात.....
दि. १२ मार्च व १२ ऑगस्ट या दोन तिथींच्या पूर्वी स्मारकाची कामचलावू साफसफाई सरकारचे संबंधित खाते करते. हेच दोन दिवस समाधीस्थळ लोकांसाठी खुले असते. अन्यथा बाराही महिने समाधीला कडीकुलपात बंदिस्त ठेवले जाते. गेली कित्येक वर्षे या समाधीस्थानी छतातून होणारी पावसाची २ गळती सरकार थांबवू शकलेले नाही. ही समाधी कोणत्या थोरपुरुषाची आहे, तो कसा दिसत होता, हे दर्शविणारी प्रतिमा व त्यांचे कार्य दर्शक फलक लावला नाही. सायंकाळ, रात्रीच्या वेळी समाधीस्थळ नीट प्रकाशमान दिसावे, यासाठी समाधीस्थळ परिसरात कोणतीही व्यवस्था नाही. शेजारच्या रस्त्यालगतच्या खांबावरील दिव्याच्या प्रकाशात समाधीचे दर्शन होते.
दिरंगाई का होतेय?
शेजारीच लागून असलेल्या स्व. मनोहर पर्रीकर यांच्या लखलखित, भव्य, विस्तारित, आधुनिक स्थापत्य कौशल्ययुक्त समाधीच्या झगमगाटाच्या पार्श्वभूमीवर, स्व. भाऊसाहेबांच्या समाधीला एक दुर्लक्षित दुय्यम, उपेक्षित असे स्वरूप आलेले आहे. ही स्थिती अपमानास्पद आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी करूनही सरकारने तिथे लक्ष दिलेले नाही.