विशेष प्रतिनिधीपणजी : गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंंधित कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांचे वय ६३ वर्षे होते. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही कर्करोगाने निधन झाले होते. त्यांच्या मागे दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सोमवारी राष्टÑीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.त्यांचे निधन झाल्याच्या अफवा गोव्यात पसरल्या होत्याच. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिष्ट्वट करून त्यांना आदरांजली व्यक्त केली, तेव्हाच सर्वांना बातमी समजली. त्यांच्यावर उद्या, सोमवारी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाध्यक्ष अमित शहा, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.शनिवारी पर्रीकर यांची प्रकृती अतिशय बिघडली होती. दोनापावल येथील त्यांच्या खासगी निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. यापूर्वी गोव्यासह मुंबई आणि अमेरिकेतही त्यांनी उपचार घेतले होते. या उपचारानंतर गेले वर्षभर निवासस्थानीच उपचार सुरू होते. शनिवारी त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवले होते. त्यांचा रक्तदाबही खूपच कमी झाला होता. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक प्रयत्नांची शर्थ करत होते; परंतु यश आले नाही. अखेर रविवारी सायंकाळी पर्रीकर पर्व संपले.समाजमाध्यमांत पर्रीकर यांच्या प्रकृतीविषयी शनिवारपासून भावना व्यक्त होत होत्या. ही स्थिती रविवारीही कायम राहिली होती. त्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या भावना व्यक्त होऊ लागल्या.दिगंबर कामतांच्यादिल्लीवारीने अफवांना ऊ तमाजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांची दिल्लीवारी ही गोव्यासह देशात अफवांचे पीक उगविणारी ठरली. त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मुख्यमंत्री करणार, अशा बातम्या समाजमाध्यमे व वृत्तवाहिन्यांनीही दिल्या. मात्र कामत यांनी या वृत्ताचा इन्कार केला. ते त्यांच्या खासगी कामासाठी दिल्लीला गेले होते, असे त्यांनी सांगितले. भाजपात जाऊन राजकीय आत्महत्या करायची नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.राष्ट्रीय राजकारणावर छापपर्रीकर वर्षभर कर्करोगाशी लढत होते. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती व अखेरपर्यंत जास्तीत जास्त कार्यरत राहण्याची त्यांची सकारात्मक वृत्ती प्रेरणादायी होती.राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप उमटविणाऱ्या पर्रीकरांंच्या निधनामुळे सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. बडेजाव न करणे हा अतिशय साधेपणा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. गोव्यातील रस्त्यांवर ते मित्रांशी गप्पा मारताना दिसत.मुंबई आयआयटी इंजिनीअर असलेले पर्रीकर संरक्षणमंत्री असतानाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता. ते गोव्याचे तीनदा मुख्यमंत्री होते.
मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे देशभर हळहळ; कर्करोगाशी झुंज अयशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 7:20 AM