पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अजुनही अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत आहेत. प्रदेश भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अमेरिकेत मुख्यमंत्र्यांसोबत गेलेले वरिष्ठ सरकारी अधिकारी उपेंद्र जोशी यांच्याशी संपर्क साधून पर्रीकर यांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली.
पर्रीकर हे येत्या 8 सप्टेंबर रोजी अमेरिकेतून गोव्यात परततील असे प्रदेश भाजपचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. तथापि, पर्रीकर हे 9 किंवा 10 रोजी गोव्यात पोहचतील अशी चर्चा सरकारी पातळीवर सुरू आहे. गणेश चतुर्थीपूर्वी तरी पर्रीकर गोव्यात परतायला हवे असे काही मंत्र्यांना वाटते. गेले दोन महिने मंत्रिमंडळाच्या बैठकाही होऊ शकलेल्या नाहीत. पर्रीकर हॉस्पिटलमध्ये असताना आरोग्य मंत्री विश्वजित राणे हेही अमेरिकेच्या दौऱ्यावर आपल्या काही कामानिमित्त गेले होते. तीन आठवड्यानंतर मंत्री राणे हे रविवारी रात्री उशिरा गोव्यात परतले.
पर्रीकर न्यूयॉकमधील 'स्लोन केटरिंग' स्मृती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अमेरिकेतच पर्रीकर मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही उपचार घेत आहेत. मंत्री डिसोझा गोव्यात कधी परततील याची कल्पना प्रदेश भाजपलाही नाही. पर्रीकर यांच्यासोबत अमेरिकेत असलेल्या उपेंद्र जोशी यांना भाजपाचे प्रमुख प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी फोन केला व पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली. पर्रीकर यांची प्रकृती ठीक आहे व ते ठरलेल्या वेळी गोव्यात परततील असे जोशी यांनी तानावडे यांना सांगितल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, पर्रीकर सरकारमधील वीज मंत्री पांडुरंग मडकईकर हे अजून मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या पत्नी जेनिता मडकईकर यांच्याशीही सरचिटणीस तानावडे यांनी संपर्क साधला व तब्येतीविषयी विचारपूस केली. मंत्री मडकईकर यांना डिस्चार्ज कधी मिळेल ते स्पष्ट झालेले नाही पण त्यांची स्थिती पूर्वीपेक्षा आता बरी आहे, असे सुत्रांनी सांगितले. गोव्यात पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत नेतृत्व बदल करायला हवा असा सूर मध्यंतरी पक्षात व्यक्त झाला होता पण आता नेतृत्व बदलाचा प्रश्न नाही असे पक्षाच्या काही राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.