पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे वैद्यकीय उपचार घेऊन अमेरिकेहून गुरुवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्री दाखल होताच नेतृत्व बदलाच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला. विद्यमान सत्ताधारी आघाडी स्थिर आहे, अशा अर्थाची विधाने गुरुवारी सायंकाळी विविध मंत्र्यांनी केली.
सरकारमध्ये दोन अपक्ष मंत्री आहेत. सरकार स्थिर ठेवण्यासाठी त्यांचा पाठींबाही खूप महत्त्वाचा आहे. अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांनी गुरुवारी पर्वरी येथील एका सोहळ्य़ावेळी सरकार स्थिर असल्याचे सांगितले. विद्यमान सत्ताधारी आघाडी एकदम स्थिर असून गेल्या सोळा महिन्यांमध्ये अनेक कामे सरकारने केली. पूर्वी ज्या झाल्या नव्हत्या, त्या अनेक गोष्टी आता झालेल्या पहायला मिळतात. महसूल व भू-विषयक सुधारणा, माहिती तंत्रज्ञान धोरण, उद्योग धोरण व अन्य अनेक गोष्टी गेल्या सोळा महिन्यांत झाल्या, असे मंत्री खंवटे म्हणाले.
पर्रिकर गेल्या आठवडय़ात पुन्हा अमेरिकेला गेले होते. मुख्यमंत्री पर्रिकर हे 8 सप्टेंबर रोजी गोव्यात येणार होते. मात्र ते दोन दिवस अगोदरच अमेरिकेहून गोव्यात पोहचले. पर्रिकर सायंकाळी दाबोळी विमानतळावर पोहचल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. पर्रिकर यांच्या अमेरिकेत विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्याविषयीचा अहवाल चांगला असल्याची चर्चा अन्य मंत्र्यांमध्ये सुरू आहे. सरकारमध्ये नेतृत्व बदल होत असल्याच्या व भाजपचे तसेच काँग्रेसचेही प्रत्येकी तीन आमदार फुटत असल्याच्या चर्चा व अफवा गेल्या काही दिवसांत रंगल्या. अफवांनी गोवा ढवळून निघाला होता. तथापि, मगोप व गोवा फॉरवर्ड हे दोन्ही घटक पक्ष आणि अपक्षही पर्रिकर यांच्याच नेतृत्वासोबत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत हे भाजपमध्ये परतणार असल्याची अफवा जास्त चर्चेत आली. सरकार पडण्याच्या अफवांमुळेच पर्रिकर अमेरिकेहून दोन दिवस अगोदरच गोव्यात दाखल झाल्याचे काँग्रेसच्या काही आमदारांकडून मानले जात आहे. पण ते खरे नव्हे, असे भाजपच्या कोअर टीमच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे.