पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे अमेरिकेतील वास्तव्य काही दिवसांनी वाढले आहे. ते या आठवड्यात गोव्यात येऊ शकणार नाहीत. येत्या 22 ऑगस्ट रोजी पर्रीकर गोव्यात परततील असे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर हे न्यूयॉर्कमधील स्लोन केटरींग कॅन्सर स्मृती सेंटर रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेले आहेत. याच रूग्णालयात पूर्वी ते तीन महिने उपचार घेत होते. पर्रीकर हे गेल्या 10 ऑगस्ट रोजी अमेरिकेला गेले होते. ते 17 ऑगस्टपर्यंत गोव्यात उपलब्ध होऊ शकणार नाहीत असे सरकारने जाहीर केले होते. पर्रीकर 19 ऑगस्ट रोजी गोव्यात परततील असे अपेक्षित होते. तथापि, येत्या 20 ऑगस्ट रोजी पर्रीकर यांची अमेरिकेतील रूग्णालयातील एका डॉक्टरशी अपॉइन्टमेन्ट ठरलेली आहे. ती भेट झाल्यानंतरच ते 22 ऑगस्ट रोजी गोव्याला परततील असे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पर्रीकर यांची प्रकृती आता ठीक आहे. तथापि, त्यांना नियमितपणे डॉक्टरांचे सल्ले घेणे गरजेचे ठरते. पूर्वी तीन महिने अमेरिकेत उपचार घेण्यापूर्वी ते मुंबईतील रूग्णालयात दाखल झाले होते. त्यांना यकृताशीसंबंधित आजार असल्याने नंतर अमेरिकेला जावे लागले होते.
पर्रीकर यांचे अमेरिकेतील वास्तव्य वाढू शकते अशी शक्यता काही मंत्री यापूर्वीच व्यक्त करत होते. आरोग्य मंत्री विश्वजित राणे हेही सध्या विदेशात गेलेले आहेत. ते आपल्या कामासाठी गेले आहेत. नगर विकास मंत्री तथा म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा हे अशक्त झालेले आहेत. त्यांनाही उपचारांची गरज आहे. ते अमेरिकेला जाऊ शकतात, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत गोव्यात भारतीय स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्य शासकीय सोहळ्य़ात ध्वजवंदन केले. मंत्र्यांना डावलून थेट सभापतींनाच ध्वजवंदन करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा विषय गोव्यात चर्चेत आला होता. पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत गोव्यात काही प्रश्न जटील बनले. मडगाव-पणजी मार्गावरील कुठ्ठाळी येथे वाहतुकीची रोज तीन ते चार तास कोंडी होते. यामुळे गोव्याच्या प्रशासनावर लोक जोरदार टीका करत असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.