मडगाव: मडगावातील काँग्रेस व भाजपा या दोन्ही गटातील नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे वादग्रस्त झालेला दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रस्ता नामकरण सोहळा शेवटी गुरुवारी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली. विद्यमान सरकारचा एकूण कारभार पाहिल्यास सरकारलाच या रस्त्याला पर्रीकरांचे नाव देणे मंजूर नाही असे वाटते. त्यामुळे आम्ही हा विचार पुढे ढकलला आहे, असे सरदेसाई म्हणाले.उद्या 13 डिसेंबर रोजी आर्लेम सर्कल ते रविंद्र भवनपर्यंतच्या रस्त्याचे मनोहर पर्रीकर रस्ता असे नामकरण करण्याचे ठरविले होते. मात्र यासंबंधीच्या ठरावाला 14 नगरसेवकांनी हरकत घेतली होती. त्यापैकी 12 नगरसेवकांनी नामकरणाविषयी जो पालिकेने ठराव घेतला होता तो रद्द करावा अशी मागणी करुन नगरपालिका प्रशासन संचालकाकडे धाव घेतली होती. यासंबंधीची सुनावणी पूर्ण होऊनही पालिका संचालक तारीक थॉमस यांनी निर्णय राखून ठेवला होता.या पार्श्वभूमीवर बोलताना सरदेसाई म्हणाले, नामकरण सोहळ्याला केवळ 12 तास राहिलेले असतानाही पालिका संचालकांनी आपला निर्णय दिलेला नाही. त्यामुळे या नामकरणाबाबत सरकारलाच अनास्था आहे असे वाटते. क्षुल्लक राजकारणासाठी पर्रीकरसारख्या नेत्याच्या नावाची आणखी अवहेलना होऊ नये असे वाटत असल्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला. मात्र प्रश्न केवळ पर्रीकरांच्याच नावाचा नव्हता तर समाजसुधारक पाद्री मिरांडा, कोंकणी हुतात्मा फ्लोरियान वाझ, ओपिनियन पोलचे हिरो उल्हास बुयांव यांचीही नावे रस्त्यांना व चौकांना देण्याचे ठरले होते. याही व्यक्तींच्या नावाना काँग्रेसचा विरोध आहे असे वाटते. फ्लोरियान वाझसारख्या हुतात्म्याचा योग्य तो सत्कार व्हावा असे आम्हाला वाटत होते. दुर्दैवाने ते होऊ शकत नाही याचीच खंत असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा या नामकरणाला विरोध होता का असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, या नामकरणाबाबतीत प्रमोद सावंत यांनी कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि याबाबतीत त्यांचे सरकार एकंदरच कसे वागते हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांना काय हवे हे सर्वांना कळून चुकले आहे. जे काय होते ते फक्त फातोर्ड्यातीलच नव्हे तर संपूर्ण गोव्याची जनता बघत आहे हे कुणी विसरु नये असे ते म्हणाले.फातोर्ड्यातील हा रस्ता चालू अवस्थेतील गोव्यातील एकमेव अत्याधुनिक असा रस्ता आहे. या प्रकल्पासाठी पर्रीकर यांनी 52 कोटी रुपये मंजुर केले होते. त्याप्रती कृतज्ञता म्हणून आम्हाला त्यांचे नाव या रस्त्याला द्यायचे होते. आम्हाला पर्रीकरांची परंपरा चालवायची नव्हती याची जाणीव संबंधितांनी ठेवावी असे सांगतानाच हा रस्ता आणखी चांगला व्हावा यासाठी प्रयत्न चालूच रहाणार असून ज्या काही गोष्टी राहून गेल्या आहेत त्या लवकरच पूर्ण करु असे ते म्हणाले.
ते बांधकाम कायदेशीरचविजय सरदेसाई यांच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या विरोधात उपजिल्हाधिकारी आणि एसजीपीडीए यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. यासंबंधी सरदेसाई यांना विचारले असता, एसजीपीडीएकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर या बांधकामाला नगरपालिकेकडून बांधकाम परवाना मिळाला. हे दोन्ही परवाने देताना ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्यानुसारच हे बांधकाम बांधले जात आहे. हे बांधकाम नवीन नसून जुन्या कार्यालयाचा केवळ तो विस्तार आहे. मला नोटिसा पाठवल्या गेल्या, हे मी केवळ वृत्तपत्रांमध्ये व सोशल मिडियावर वाचले आहे. अद्याप मला या नोटिसा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यात काय मुद्दे उपस्थित केले आहेत हे मला माहीत नाही. ज्यावेळी ती नोटीस मिळेल त्यावेळी तिला कायदेशीर उत्तर दिले जाईल असे त्यांनी सांगितले.