पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना दोन माणसे हाताला धरून घेऊन येतात व घेऊन जातात ही स्थिती पाहावत नाही. पर्रीकर यांनी आता सन्मानाने खुर्ची सोडावी, असा सल्ला काँग्रेस पक्षाने शनिवारी (2 फेब्रुवारी) दिला आहे.
आमदार व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी मंत्री रमाकांत खलप यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी येथे काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. रेजिनाल्ड म्हणाले, की पर्रीकर यांनी राजीनामा द्यावा असे आम्ही त्यांना सांगण्याची गरज नाही. त्यांना स्वत:हून त्यांची स्थिती कळायला हवी. पर्रीकर यांची सध्याची स्थिती पाहिली तर त्यांनी आरोग्याकडेच लक्ष देण्याची गरज आहे. गोव्याची जगासमोर योग्य प्रतिमा जात नाही. फ्रान्सिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर हे भाजपाचे दोन आमदार ज्या प्रमाणे सध्या आरोग्याची काळजी घेत आहेत, तशी काळजी पर्रीकर यांनी घ्यावी. त्यांनी सन्मानाने पायउतार होण्याची ही वेळ आहे.
विधानसभेतील कामगिरीविषयी काय वाटते असे पत्रकारांनी विचारले असता, दिगंबर कामत म्हणाले की, लोकांनी लाईव्ह पद्धतीने टीव्हीवर कामकाज पाहिले आहे. सत्ताधारी व विरोधक आणि एकूण प्रत्येकाची कामगिरी लोकांनी अनुभवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पर्रीकर किंवा अन्य कुणावर व्यक्तीश: मी बोलत नाही.
रमाकांत खलप म्हणाले, की गोव्याला जर योग्य स्थितीतील सक्षम मुख्यमंत्री मिळाला असता तर यावर्षी गोव्याला चांगला अर्थसंकल्प मिळाला असता. पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा दुसऱ्याकडे द्यावा. त्यांनी राजीनामा देऊन घरी जावे असे मी म्हणत नाही पण तात्पुरता तरी दुसऱ्याकडे ताबा देणे गरजेचे आहे. त्यांनी अर्थसंकल्प म्हणून काहीच नवे मांडले नाही. केवळ गेल्यावर्षीचे कॉपी पेस्ट केले आहे.
दरम्यान, विद्यमान सरकार कोसळले तर, काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल की विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल असे विचारले असता, आम्ही त्याबाबत निर्णय घेतलेला नाही, जेव्हा स्थिती येईल तेव्हाच निर्णय घेऊ असे खलप यांनी सांगितले. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला, तो अर्थसंकल्प नव्हे तर तो भाजपाचा जाहिरनामा आहे, असे खलप म्हणाले.