राफेलप्रश्नी मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांची राहुल गांधींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 05:49 PM2019-11-14T17:49:37+5:302019-11-14T17:50:05+5:30
राफेलप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
पणजी: राफेलप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. आपले वडील आजारी असताना गांधी यांनी वडिलांची भेट घेऊन त्या भेटीचा वापर राजकारणासाठी केला होता, अशा शब्दांत उत्पल यांनी शरसंधान केले आहे.
उत्पल यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी राफेलप्रश्नी उत्पल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पत्र लिहून उत्तर दिले होते. पवारांच्या काही विधानांना त्यावेळी उत्पल यांनी आक्षेप घेतला होता. आता राफेलप्रश्नी उत्पल म्हणाले, की न्यायालयीन निवाडा हा राहुल गांधी यांच्यासाठी शिकण्यासाठी चांगला अनुभव आहे. गुड लर्निग एक्सपीरिअन्स.
उत्पल म्हणाले, की राफेलप्रश्नी राहुल गांधी यांनी चुकीची राजकीय गेम खेळली. त्यांचे नियोजन फसले. अशाच प्रकारे कच्चे नियोजन करून राहुल गांधी यांनी आपल्या आजारी वडिलांच्या भेटीचा विषयही राजकारणासाठी वापरला होता. राहुल गांधी यांना आपण आता राफेलप्रश्नी त्यांच्या कच्च नियोजनाबाबत संशयाचा फायदा देतो.
पर्रीकर आजारी असताना राहुल गांधी गोवा भेटीवर होते. त्यावेळी अचानक पणजीतील विधानसभा प्रकल्पात येऊन राहुल गांधी यांनी पर्रीकर यांची भेट घेतली होती. पर्रीकर यांच्या तब्येतीविषयी राहुल गांधी यांनी त्यावेळी विचारपुस केली होती पण नंतर लगेच त्यांनी केरळला जाऊन राफेलप्रश्नी काही विधाने केली होती. राफेलप्रश्नी नव्या डिलमध्ये आपल्याला कोणतीही भूमिका नाही, असे पर्रीकर यांनी सांगितल्याचे विधान गांधी यांनी केले होते. अर्थात पर्रीकर यांनी स्वत: दुस:या दिवशी राहुल गांधी यांना उत्तर दिले होते व राहुल गांधी गोवा भेटीवेळी आपल्याशी राफेलबाबत काहीच बोलले नव्हते हे पर्रीकर यांनी स्पष्ट केले होते. उत्पल यांनी या पाश्र्वभूमीवर गुरुवारी भाष्य केले.
दरम्यान, उत्पल हे सक्रिय राजकारणात नसले तरी, पणजी विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र ते सक्रिय आहेत. पणजीतील कार्यर्त्यांमध्ये ते प्रिय आहेत. ते सातत्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये संपर्कात असतात.