- नीना नाईक ( मनोहर पर्रीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त लोकमतने हा लेख प्रसिद्ध केला. आज पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही पुनर्प्रकाशित करत आहोत. )भ्रष्टाचाराचा हिमालय आणि फॅमिली राजचा अरबी समुद्र राज्याला ग्रासून राहिला होता. आता काही तरी केले पाहिजे हे सर्वांना जाणवत होते, पण ते कसे याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. वर्ष २0११. काँग्रेसचे सरकार डळमळते आहे हे लक्षात यायला लागले होते. एक धक्का और आणि हे सरकार कोसळणार हे त्यांच्या लक्षात आले. सरकारविरुद्धचे कोणतेही आंदोलन असो त्यात भाई अग्रभागी. वर्षभर वातावरण तापवत नेले आणि परिवर्तन यात्रा हा सर्वावरचा मास्टर स्ट्रोक.ही बजबजपुरी मी थांबवू शकतो हा विश्वास भाईने सर्वांना दिला. त्यांच्या हाकेला ओ देत अनेक कार्यकर्ते जवळ आले. सुशिक्षित वर्गही सोबत आला़ या उत्साहाला दिशा देण्यासाठी कार्यकर्त्यांची फ ौजही महत्त्वाची.विशिष्ट पद्धतीने संघटन झाले़ शिस्तबद्धता हा हुकमाचा एक्का होता. शिस्त पाळली तर सत्तेचं दान सहज पदरी पडेल हे चाणाक्ष भार्इंनी ओळखले होते.गावागावात भ्रमंती, घराघरात बैठका घेणे सुरू झाले़ सुरुवातीला थंड प्रतिसाद असला तरी एकदा विचार पटल्यावर गल्ली-बोळ, चावड्या, सभा हा क्रम सुरू झाला़ नवीन फौज कालांतराने सुसज्ज झाली़ हजारोंना साथ घेऊन राज्यात ‘कमळ’ फु लले़याला कारणीभूत ठरला एक झंझावात. मनोहर पर्रीकर त्याचे नाव. हा झंझावात राज्याची गतप्रतिष्ठा मिळवण्यासाठी धडपडत होता. त्याला गोव्यात सुराज्य आणायचे होते. या काळात कार्यकर्ता म्हणून अनेक गोष्टी शिकता आल्या. हेरगिरी केली, पण त्यात आर्थिक देवाणघेवाण नव्हती़ राजकारण करताना अंतर ठेवणे, फ टकून वागणे हे समीकरण पक्के केले़ पिळवणुकीच्या राजकारणाला मोडीत काढले़ संभाव्य बंडखोरांशी चर्चा करून त्यांना सामावून घेतले. कार्यकर्त्यांच्या पलटणीमुळे खुपशा गोष्टी सुलभ झाल्या़ सर्वांची चांगली साथ लाभली़ कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्याने नेमून दिलेली कामे शिस्तबद्धपणे होऊ लागली़गोवा पिंजून काढणे म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिले. त्यातून कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. न डगमगता निर्णय घेणे हे नित्याचे असले तरी काळवेळ बघून काही वेळा काळीज सुपाएवढे केले. कार्यकर्त्यांच्या चुकांवर पांघरूण घातले़ मतदरांना कार्यकर्ता हवेत इमले बांधण्याचे स्वप्न दाखवत असेल तर चुकीची जाणीव करून दिली़ एखादा कार्यकर्ता जुमानत नाही हे लक्षात येताच पूर्णपणे सूत्रे स्वत:कडे घेतली़ चुचकारले की कार्यकर्त्यांचे अवसान दुप्पट होते़ त्यातून अनेक अडचणी येतात, कुजबूज होते, घोळ वाढतात, लक्षात घेऊन गस्त घालणे कळत नकळत केले़सरकारी खजिना रीता असतानाही विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या. अशी जादूची कांडी फिरवणे कोणालाच जमले नव्हते. योजनांचा मोघमपणे उल्लेख कार्यकर्त्यांकडे करून वादळ होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांच्या मदतीने योजनांत दुरुस्ती केली. त्यामुळे वाद टळले. ही सर्व कामे एकहाती करून सत्तेचा डिंडिम राज्यभर वाजवत आपल्या नावाची द्वाहीही फिरवली. आज भाई राज्य सोडून गेले असले तरी प्रत्येक कार्यकर्ता अभिमानाने छाती पुढे काढून सांगतो ‘आमचो भाई सुरक्षा मंत्री जालो’़वैचारिक क्रांतीचे उद्गान त्यांच्याच काळात झाले़ सर्व धर्म समभाव न्यायाने सर्वांना संरक्षण देणारे भाई कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हिरोच आहेत़ साध्यातला साधा समारंभ असो, कार्यक्रम असो, विरोधी पक्षात असो अथवा नसो कार्यकर्त्यांचे पाऊल पोलिसांच्या ताकदीला आव्हान असायचे़सरकार कोसळले, लाठीहल्ला झाला़ पोलिसांच्या हातातील दंड हवेत फि रून मोर्चेकऱ्यांवर पडले़ कार्यकर्ते झोडपून निघाले़ मोर्चे उधळले़ धुमश्चक्री वाढली़ पळापळ झाली, पण कार्यकर्त्यांनी धीर गमावला नाही़ चेंगराचेंगरी, जखमी कार्यकर्त्यांचे हालहाल झाले़ भाईच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला नाही़ एकत्र कुटुंब पद्धत असल्यागत एकमेकांचे सांत्वन करत राहिले़ बटालियनमध्ये ताकद नव्हती असे नाही. ‘फ ायर’ म्हणायची उसंत वातावरण पेटून उठले असते़ पण शिस्तबद्धता हा कार्यकर्त्यांचा गुण़ आदेशाचे गणित कार्यकर्त्यांना कळते़ भविष्यात कार्यकर्त्यांनाच हेकठीण जाईल हे लक्षात घेऊन भाई अशावेळी मनावरताबा ठेवत़ उंच ठिकाणी उभे राहून सर्वांना शांत करत़ दोनच शब्द अजूनही कार्यकर्त्यांच्या कानात घुमतात़ ‘असे वागाल तर मी निघून जाईन.’ कुठे, काय हे कुणालाच ठाऊक नाही फ क्त इमोशनल ब्लॅकमेल. स्मशान शांतता, निवळलेले मावळे़ किती प्रचंड आदऱ बेलीफ ची नोटीसच जणू़सार्थ अभिमान आहे मला ह्या सर्व कार्यकर्त्यांचा. भाईच्या नावाने भाळी मातीचा टिळा लावून ते भार्इंना मानाचा मुजरा करतात़ कितीही अजस्र मेघ एकमेकांवर आदळले, वादळे उठली तरी तटस्थपणे आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हत्तीचे बळ आमच्यात आहे. तुम्ही पुढे व्हा हा कार्यकर्त्यांचा जोश भाईना आखाड्यात कुस्ती खेळणाºया पेहलवानासारखा उपयोगी पडतो़ राजकारणाच्या आखाड्यातली कुस्ती पाहाताना अनेकदा कार्यकर्त्यांचे श्वास रोखले जात. डावाचा प्रतिडाव शब्दांनी जिंकण्याची कला भाईकडे असल्याने कित्येक वारे त्यांनी भुईसपाट तरी केले नाही तर परतवले़ भाई बोलतात, पण मूठभर मास मात्र कार्यकर्त्यांच्या अंगावर चढते़भार्इंचे संवाद, त्यांचे समोरच्याला कमी लेखणे हे करावे तर आमच्या भाईनेच असे जाहीरपणे काही वेळा कार्यकर्ते सांगतात़ मनातल्या मनात जयजयकार करतात़ तर कधी गुलाल उधळून आनंद साजरा करतात़ सर्व करत असताना भाईची काळजी घेतात़ जेवणाखाणाची आबाळ होणार नाही़ फु टी चहा, बशीतून पिणे रूचत असल्याने कपबशीची व्यवस्था़ कार्यकर्त्यांची भार्इंवर इतकी श्रद्धा की जाताजाता सहजपणे देवदेवतांनाही सांगणे सांगून घेतात़ त्यांच्या आजारपणात देवाला शिक्षाच नव्हे तर देव पाण्यात़ भाईचे आजारपण म्हणजे घरातील प्रिय व्यक्तीचे आजारपण़ अन्नाची वासना नाही, झोप उडालेली, डोळ्याच्या कडांशी पाणी आता येईल की मग़भाई भाई म्हणून नुसतेच मागेमागे न राहाता त्यांच्यासाठी नि:स्वार्थीपणे काहीही करायची तयारी असलेल्या कार्यकर्त्यांची यादी खूप मोठी आहे़ आनंदोत्सव, होळी, वाढदिवस, सण, लग्नकार्य, सर्वच महोत्सव कसे साजरे करायचे़ एकमेकांचे हेवेदावे असतील कार्यकर्त्यांत पण भाईसाठी सर्वच कुशीक़ हजारोंची उपस्थिती असो, पण भार्इंचे भाषण असले की चुळबूळ न करता शांत चित्ताने शब्दनशब्द कानात साठवून ते घरी जातात़कार्यक्रम संपल्यावर भारावलेल्या चर्चा़ कौतुक वाटते ते आमच्या हिप्नोटाईज झालेल्या कार्यकर्त्यांचे. कशाचाही मुलाहिजा न बाळगता आपली ओळख करून देताना अभिमानाने तो पर्रिकरांचा कार्यकर्ताच म्हणवून घेतो़ जणू काही आपण भार्इंना स्वीकारले आहे तसेच भाईनेही आम्हाला गुणदोषासकट स्वीकारले आहे़स्वच्छ प्रतिमा ठेवून जगापुढे आदर्श ठेवणारा नेता दुर्मिळ. कित्येक जुन्या आठवणी काढत काढत १३ डिसेंबरला सर्व कार्यकर्ते भाईच्या वाढदिवसाला त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी भेटतील़ गोडगोड आठवणी घोळवत, मनोमन सुखावतील. हा सर्व करिष्मा व्यक्तीचा. कार्यकर्त्यांच्या हक्काच्या़ आणि एक झंझावात आणखी पुढे सरकत राहील.
मनोहर पर्रीकर नावाचा झंझावात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:29 AM