मनोहर पर्रीकरांची चतुर्थी गोव्यातच, पण यावेळी मंत्र्याच्या घरी पुरणपोळी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 02:25 PM2018-09-05T14:25:02+5:302018-09-05T14:25:14+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेत उपचार घेत असले तरी, ते गणेश चतुर्थीपूर्वीच गोव्यात परतणार आहेत हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
- सदगुरू पाटील
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेत उपचार घेत असले तरी, ते गणेश चतुर्थीपूर्वीच गोव्यात परतणार आहेत हे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पर्रीकर गोव्यातच चतुर्थी साजरी करतील. मात्र यावेळी प्रथमच ते कदाचित बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या निवासस्थानी जाऊन पुरणपोळ्या खाणार नाहीत. पर्रीकर हे गणोशोत्सवानंतर गोव्यात परततील अशा प्रकारची चर्चा राजकीय गोटात सुरू होती. पर्रीकर 8 सप्टेंबर रोजी गोव्यात दाखल होतील, असे यापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले आहे. तरीही अनेक गोमंतकीयांना ते पटत नव्हते. कारण मुख्यमंत्री नेमके कधी परततील याविषयीच्या तारखा वेगवेगळ्या सांगण्याचे प्रकार भाजपाकडून यापूर्वी केले गेले आहेत. यावेळी मात्र मुख्यमंत्री चतुर्थीपूर्वी गोव्यात असतील हे स्पष्ट झाले आहे.
8 किंवा 9 सप्टेंबरला मुख्यमंत्री गोव्यात दाखल होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. पर्रीकर यांच्या दोन वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पर्रीकर हे अमेरिकेहून गोव्यात गेल्या 22 ऑगस्ट रोजी परतले होते. मात्र तब्येतीत पुन्हा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथून पुढील उपचारांसाठी अमेरिकेत नेण्यात आले.
महाराष्ट्राप्रमाणेच गणोशोत्सव हा गोव्यात मोठा सण असतो. चतुर्थीच्या काळात गोव्यात दहा-अकरा दिवस सुटीचेच वातावरण असते. पर्रीकर हे दरवर्षी त्यांची चतुर्थी खोर्ली येथील त्यांच्या निवासस्थानी साजरी करतात. यावेळीही पर्रीकर चतुर्थीवेळी गोव्यात असतील. ते पूर्वीसारखे गोमंतकीयांमध्ये जास्त मिसळणार नाहीत. पूर्वी दर चतुर्थीवेळी पर्रीकर हे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या निवासस्थानी जायचे व त्यांच्या घरी खास पद्धतीने तयार केल्या जाणा-या पुरणपोळ्य़ांचा आस्वाद घेत असे. तसेच काही गोमंतकीयांच्या घरी पर्रीकर न चुकता चतुर्थीवेळी भेट देत असे. आरोग्याच्या कारणास्तव यावेळी ते चतुर्थीवेळी घरीच राहतील असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही अमेरिकेतच वैद्यकीय उपचार घेत आहेत. ते मात्र चतुर्थीवेळी गोव्यात नसतील. ते अमेरिकेतच असतील. डिसोझा यांनी मंगळवारी रात्री अमेरिकेहून लोकमतच्या प्रतिनिधीशी संवादही साधला व आपल्याला उपचारांनंतर आता बरे वाटत असल्याचे सांगितले.