- राजू नायक
पणजी- मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज कोणत्याही परिस्थीतीत स्वत:च राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचे निश्चित केल्याने ते गोव्याला यायला निघाले. गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विशेष विमानाने मनोहर पर्रिकर गोव्यात दाखल झाले आहे. मुख्यमंत्री पर्रिकर गेल्या आठ दिवसापासून मुंबईच्या लिलावती इस्पितळात पचनक्रियेतील बिघाडावर उपचार घेत आहेत़
विधानसभेच्या सोमवार पासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पर्रिकर उपस्थित राहू शकले नाहीत. आज अर्थसंकल्प सादर करायचा असल्याने ज्येष्ठ मंत्री म्हणून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर यांना अर्थसंकल्प विधानसभा पटलावर ठेवण्यास सभापतींनी सांगितले आहे. सभापती डॉ प्रमोद सावंत यांनी दोन दिवसापूर्वी मुंबईत पर्रिकरांची भेट घेतल्यानंतर ती तात्पूर्ती सोय केली होती. परंतु पर्रिकरांना वाटते की, ढवळीकरांना ही संधी मिळू नये.
पर्रिकर दुपारच्या विमानाने गोव्यात उतरत असून दुपारी अडीच वाजता विधानसभेत दाखल होऊन ते अर्थसंकल्प सादर करतील. त्यांना उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची आवश्यकता नसून आजार गंभीर असला तरी त्यांनी मुंबईतच उपचार घ्यावेत असा सल्ला त्यांना तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळ अर्थसंकल्प सादर करुन ते तातडीने मुंबईला परततील अशी शक्यता आहे