पणजी- वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वाड्यावस्त्यांवरील मुलांना त्यांचे पालक शहरातील शाळांमध्ये पाठवत असल्याने सरकारी शाळांतील मुलांची पटसंख्या कमी झाली. त्यामुळे राज्यातील सरकारी प्राथमिक शाळा बंद पडत असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित श्रद्धांजलीपर सभेत पर्रीकर उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी राज्यातील गावागावांत शिक्षण पोहोचविले. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम माजी मुख्यमंत्री स्व. शशिकलाताई काकोडकर यांनी केले. शशिकलाताई काकोडकर यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेताना भाऊसाहेब बांदोडकर यांना डावलता येणार नाही, त्यामुळे पर्रीकर यांनी भाऊसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला सांष्टांग नमस्कार करीत असल्याचे सांगत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आणि सार्वजनिक विकासाविषयी केलेल्या कामाचा उल्लेख आपल्या भाषणात आवर्जुन केला. राज्यातील सरकारी मराठी शाळा बंद पडत असून, त्यामागे सरकारचा डाव असल्याचा आरोप भारतीय भाषा सुरक्षा मंच करीत आले आहे.
सव्वाशेच्यावर सरकारी प्राथमिक मराठी शाळा बंद पडल्या असून, अजून काही शाळा सरकार बंद करणार असल्याचे भाभासुमंचे म्हणणो आहे. याबाबत माध्यमांनीही त्यावर प्रकाश टाकला होता. या वृत्ताचा दाखला देत र्पीकर म्हणाले की, गावागावात सरकारी प्राथमिक शाळांना मुले मिळत नाहीत, त्यामुळे ते बंद पडत आहेत. याला कारणीभूत वाहतूक व्यवस्था आहे. आई-वडील शहरात काम करीत असेल, तर वाहनावरून ते मुलांना शहरातील शाळात दाखल करतात. पूर्वी अशी वाहतूक व्यवस्था नव्हती. आठ-आठ किलोमीटर पायपीट करावी लागत असे, त्यामुळे त्या काळी सरकारी शाळांना मुले मिळत होती, आता परिस्थिती बदलली आहे, असा खुलासा करीत त्यांनी शाळा बंद पडण्यामागे सरकारला दिल्या जाणाऱ्या दोषाबाबत स्पष्टीकरण दिले.