ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 12 - मोदींच्या मंत्रिमंडळातील विश्वासू सहकारी असलेल्या मनोहर पर्रिकर यांची घरवापसी होणार आहे. मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा, मगोप, गोवा फॉरवर्ड आणि तीन अपक्ष आमदार यांच्या सहभागाने गोव्यात आघाडी सरकार अधिकारावर येण्याचा मार्ग रविवारी सायंकाळी मोकळा झाला. पर्रिकर हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देतील. रविवारी त्यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना भेटून सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला.
भाजपचे केंद्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शनिवारी रात्री गोव्यात दाखल झाले. रविवारी सकाळपासून जोरदार हालचाली सुरू झाल्या आणि आघाडी सरकार स्थापन करावे, असे ठरले. पर्रिकर यांनी सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. सर्वप्रथम मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी पाठिंब्याची हमी पर्रिकर यांना दिली. मगोपकडे तीन आमदार आहेत. त्यानंतर गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनीही पाठिंब्याची हमी दिली. गोवा फॉरवर्डकडेही तीन आमदार आहेत. पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि प्रसाद गावकर या तीन अपक्षांनीही पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दर्शविला. गडकरी यांच्यासोबत सर्व 21 आमदारांना घेऊन पर्रिकर यांनी रविवारी सायंकाळी उशिरा काबो राजनिवासावर राज्यपालांची भेट घेतली व आपल्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याचे सांगितले. पर्रिकर यांनी सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला. त्यामुळे 17 आमदार निवडून येऊन देखील काँग्रेसवर पुन्हा विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली.
2014 साली पर्रिकर हे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन केंद्रात मंत्री म्हणून गेले होते. प्राप्त राजकीय स्थितीत पर्रिकर यांच्याशिवाय गोव्यातील भाजपकडे अन्य कुणीच स्वीकारार्ह नेता नाही. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरही पराभूत झाले. भाजपचे संख्याबळ 21 वरून केवळ 13 वर आले. त्यामुळे पर्रिकर यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून गोव्यात आणले जाईल.
पर्रिकर मुख्यमंत्री होत असल्यामुळे आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सहभागी होत असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. विरोधी काँग्रेस पक्ष निवडणूक निकाल लागून 24 तास झाले तरी आपला नेता ठरवू शकला नाही. मुख्यमंत्री पदासाठी प्रतापसिंग राणे, लुईङिान फालेरो व दिगंबर कामत इच्छुक होते. दिग्विजय सिंग यांनी गुप्त पद्धतीने 17 आमदारांचे मतदानही घेतले. रात्रीर्पयत त्या मतदानाचा निकालही दिग्विजय सिंग यांनी जाहीर केला नाही. फालेरो यांचे नेतृत्व स्वीकारण्यास मगोप तसेच गोवा फॉरवर्डही तयार नव्हता. त्यांनी भाजपप्रणीत आघाडीची वाट धरली.
पक्षीय बलाबल
———————————————
विधानसभा सदस्य संख्या : 40
बहुमतासाठी गरज : 21
भाजप : 13
काँग्रेस : 17
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप) : 3
गोवा फॉरवर्ड : 3
राष्ट्रवादी काँग्रेस : 1
अपक्ष : 3
——————————————
यांचे असेल सरकार
भाजप : 13
मगोप : 3
गोवा फॉरवर्ड : 3
अपक्ष : 2