पणजी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी माध्यम प्रश्नी हेत्त्वारोप केल्यामुळे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर कमालीचे उव्दिग्न बनले आहेत. दिल्लीला कंटाळलेल्या पर्रीकरांना आता गोव्याचे वेध लागले आहेत.
संघाचे प्रभूत्त्व असलेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचने सध्या गोव्यात शिक्षण माध्यमाच्या प्रश्नावर भाजपविरोधात आघाडी उघडली असून पर्रीकर यांना लक्ष्य केले आहे. 2012 च्या विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात भाजपने माध्यम प्रश्नी पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले होते. तत्पूर्वी याच प्रश्नावर काँग्रेस सरकारविरोधात संघाचे नेते व पर्रीकर यांनी आंदोलन छेडले होते. काँग्रेसच्या कारकिर्दित दिगंबर कामत यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने खिस्ती डायोसिसन संस्थांच्या शाळांना अनुदानाचा निर्णय घेतल्याने हे आंदोलन गोव्यात सुरु झाले व त्यानंतर उसळलेल्या जनक्षोभात 2012 च्या निवडणुकीत काँग्रेसला नामुष्की पत्करावी लागली.
पर्रीकरांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनीही डायोसिसन संस्थेच्या शाळांचे लांगुनचालन सुरुच ठेवले. आता निवडणुकीला जेमतेम वर्षभर राहिले असताना हे आंदोलन पुन: सुरु झाले आहे. मध्यंतरी या प्रश्नावर संघ आणि भाजप यांच्यात सुवर्णमध्याचा प्रयत्न झाला परंतु अनुदान मागे घ्या, अशी भूमिका वेलिंगकर यांनी कायम ठेवली त्यामुळे तडजोड होऊ शकली नाही.
या सर्व पाश्र्वभूमीवर दुसरीकडे पर्रीकर गोव्यात येण्याच्या वेगवेगळ्या शक्यता आजमावून पहात आहेत. गोव्यात येणे किंवा न येणे हा आपल्या रणनीतीचा भाग असल्याचे दोन दिवसांपूर्वीच पर्रीकर यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. पर्रीकर हे दिल्लीत कमालीचे अस्वस्थ आहेत. पर्रीकर गोव्यात आल्यास भाजपला जनाधार मिळू शकेल, असे भाजपच्या हितचिंतकांनाही वाटते. आगामी निवडणुकीपूर्वी स्वत: मुख्यमंत्री बनून भाजपची लोकप्रियता वाढविणे यासाठी पर्रीकरही अनुकूल दिसतात. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनीही तशी निकड सूचित केली आहे.
गोव्यात येण्यासंबंधी पर्रीकर यांनी संघाकडे नागपूर येथेही बोलणी सुरु केली आहेत. या आठवड्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याच विषयावर भेट घेण्याची शक्यता आहे. मोदींनी गोव्यात पाठवण्यास नकार दिला तर पर्रीकर राजकारणातून संन्यास घेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. ‘‘पर्रीकर सध्या अत्यंत अस्वस्थ असून जर त्यांच्या मनासारखे झाले नाही, तर पुढच्या पाच वर्षात घेतली जाणारी निवृत्ती ते आजच पसंत करतील," असे त्यांच्या एका निकटवर्तीयाने बोलून दाखवले. गेल्या महिनाभरापासून पर्रीकर अस्वस्थ आहेत. गोव्यात येणे किंवा राजकारणातून निवृत्त होणे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर आहेत.