पणजी - सरकारी फाइल्सवरील मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या सह्या बोगस असल्याचा तसेच त्यांचे कोणीतरी नातेवाईक किंवा अधिकारी सह्या करीत असावेत असा संशय काँग्रेसने व्यक्त केला असून यासंबंधी पोलिस महासंचालकांना तक्रारीचे निवेदन दिले आहे. फाइल्स ताब्यात घ्याव्यात आणि सह्यांची फॉरेन्सिक तपासणी करावी तसेच संबंधितांविरुध्द भादंसंच्या कलम ४६५, ४६७, ४६८, ४७0 (३४सह) तसेच कलम १२0 (ब) खाली गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी केली आहे.
मंगळवारी दुपारी पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष विजय भिके व कार्यकर्त्यांनी तक्रारीचे हे निवेदन पोलीस उपमहानिरीक्षकांच्या कार्यालयात सादर केले. नंतर पत्रकार परिषदेत बोलताना भिके म्हणाले की, ‘भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचे याआधीही बोगस सह्यांचे प्रकरण गाजले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने गंभीर आजारी असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेले आहे. गंभीर आजारी असताना पर्रीकर फाइल्सवर सह्या कसे काय करु शकतात हा प्रश्न आहे. त्यांच्या नावाने अन्य कोणीतरी सह्या करीत असावे, असा संशय आहे. वित्तीय बाबींशी संबंधित महत्त्वाच्या फाइल्स तर चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घ्यायलाच हव्यात. सह्यांची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर बऱ्यांच गोष्टी उघड होऊ शकतील.’
भिके म्हणाले की, ‘पर्रीकरांच्या आरोग्याची स्थिती पाहता फाइल्स हातावेगळ्या करण्याची त्यांची क्षमता नाही हेच स्पष्ट होते. त्यामुळे जुन्या फाइल्सवरील पर्रीकरांच्या सह्या आणि आताच्या सह्या याचीही पडताळणी व्हायला हवी. बोगस सह्या आढळून आल्यास संबंधितांविरुध्द कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.’
काही महत्त्वाच्या फाइल्सबाबत आरटीआय अर्ज करुन आम्ही माहिती घेणार आहोत तसेच या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद करेपर्यंत दबावसत्र चालूच ठेवणार आहाते, असे भिके यांनी स्पष्ट केले