लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : उंडीर येथे मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होणार आहे. त्यामुळे लोकांनी आक्रमकपणे त्याचा विरोध करायला हवा. भोम येथे अवघ्या लोकांनी सुरू केलेले आंदोलनांना राज्यभरातील गोमंतकीय पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावला आहे. उंडीर येथील नागरिकांनीही गांभीर्याने आंदोलन पुढे न्यावे. आरजी पक्ष तुमच्याबरोबर राहील. वेळ पडल्यास छातीवर गोळ्याही झेलायला आमचे कार्यकर्ते तयार आहेत, असा इशारा रेवोल्युशनरी गोवन पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी दिला.
उंडीर येथील मलनिस्सारण प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार वीरेश बोरकर व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. पूर्वजांनी राखून ठेवलेली शेती, बागायती विविध प्रकल्पांच्या नावाखाली नष्ट होत आहे. उंडीर येथील मलनिस्सारण प्रकल्पामुळे गावाचा विनाश होणार आहे. सरकारला जर सदर प्रकल्प मडकई मतदारसंघात आणायचाच असेल तर तो त्यांनी खुशाल शहापूर येथील झोपडपट्टी भागात न्यावा. तसे झाल्यास आम्ही सरकारला उघड पाठिंबा देऊ. प्रकल्पात महिलांच्या सेल्फ हेल्प ग्रुपसाठी जागा देण्याची भाषा होत आहे. मडकई औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या विविध औद्योगिक आस्थापनामध्ये किती महिलांना व युवकांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या, हे त्यांनी अगोदर सांगावे. येथील प्रत्येक युवकाला नोकरी मिळाल्यास मी ढवळीकर यांच्या घरी त्यांची लाचारीसुद्धा करायला तयार आहे, असेही परब म्हणाले.
आमदार बोरकर म्हणाले की, सरकार काही लोकांच्या हितासाठी प्रकल्प आणत आहे. प्रकल्प आणण्यापूर्वी स्थानिकांची मंजुरी घ्यावी. गाव नष्ट करून झालेला विकास आम्हाला नको. विकासाच्या नावाखाली ग्रामीण भागाचे शहरीकरण सुरू आहे. असेच होत राहिल्यास गोव्याची मूळची ओळख नष्ट होईल. जनतेने सरकारला कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, लोकांना सतावण्यासाठी नाही. यावेळी विश्वेश नाईक, प्रेमानंद गावडे यांचीही मार्गदर्शन केले.
... तर त्यांची आयुष्यभर सेवा करीन
चतुर्थीच्या वेळी येथील लोकांना पैशाचे आमिष दाखवून लाचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यांनी ते बंद करावे. हिंमत असेल तर प्रत्येक महिन्याला प्रत्येक कुटुंबाला पंधरा हजार रुपये देण्याची तरतूद करावी. असे झाल्यास आयुष्यभर त्यांच्या घरी जाऊन सेवा करायला मी तयार आहे, असे परब यांनी सांगितले.