लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्सचे नेते मनोज परब हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गोवा शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्याबाबत सध्या काहीच बोलत नाही. वेळच सांगेल, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी केला.
गोव्यातील प्रस्थापित राजकारणातील चार ते पाच नेतेसुध्दा शिवसेनेच्या संपर्कात आहेत. यात काही माजी आमदारांचा समावेश आहे. या सर्व लोकांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या अटी काय हे जाणून घेतले जात आहे. त्यामुळे त्यावर आताच काही बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
अडसूळ म्हणाले, की शिवसेना गोव्यात विस्तार करू पाहात आहे. त्यादिशेने ठोस पावलेही उचलली जात आहेत. गोव्यातील अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. ते पक्षात येण्यास इच्छुकही आहेत. मात्र याचा अर्थ ते थेट पक्षात प्रवेश करतील, असे नाही. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. काहींचे अमुक नेता शिवसेनामध्ये आला तर आपण येणार नाही, असेही सुरू आहे. त्यामुळे या सर्वांना एकत्र घेऊन बैठक घेणे, चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. कारण पक्षाच्या कामावर त्याचा परिणाम होता नये, असे त्यांनी सांगितले.
आम्हाला सर्व जणांना एकत्र घेऊन काम करायचे आहे. आरजीचे गोव्यातील प्रमुख मनोज परब यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी मंगेश चिवटे यांच्याशी चांगले संबंध आहेत. शिंदे यांची परब यांनी भेटसुध्दा मुंबईत घेतली होती. ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. परंतु ते शिवसेनेत येणार की नाही यावर आताच सांगू शकत नाही. आपण हो किंवा नाही असे काहीच म्हणत नाही. वेळ आली की सर्व समजेल, असे अडसूळ यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"