लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:काँग्रेस पक्षाने आपल्या माजी तसेच विद्यमान प्रदेशाध्यक्षांच्या मार्फत अनेक अपात्रता याचिका दाखल करणे हे अयोग्य असल्याची बाजू पक्षांतर केलेल्या त्या आमदारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठात शुक्रवारी सांगितले.
काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या त्या आठ आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिका सभापतींनी ९० दिवसांत निकाली काढण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी या ८ आमदारांनी वरील बाजू मांडली.
पक्षांतर प्रकरणी आम्हाला अपात्र ठरविण्यासाठी काँग्रेस पक्षाने आपले माजी प्रदेशाध्यक्ष चोडणकर, तसेच विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या मार्फत सभापतींसमोर याचिका सादर केली आहे. अपात्र दिगंबर कामत मायकल लोबो ठरविण्यासाठी पक्षाने विविध याचिका दाखल करणे योग्य नाही.
अपात्रता याचिका ठरावीक दिवसांमध्ये निकाली काढावी, असे निर्देश न्यायालयात सभापतींना देऊ शकत नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयात याबाबत यापूर्वीच एक याचिका प्रलंबित असल्याची बाजू या आठ आमदारांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाच्या एका खटल्यातील निवाड्यानुसार न्यायालय सभापतींना ९० दिवसांत अपात्रता याचिका निकाली काढण्याचे निर्देश देऊ शकते, अशी बाजू यावेळी चोडणकर यांचे वकील अॅड. अभिजित गोसावी यांनी न्यायालयात मांडली.
सभापतींकडे युक्तिवाद
फुटीर आमदार दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्या विरोधात सादर केलेल्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या याचिकेवर सभापतींसमोर अंतिम युक्तिवाद सुरू झाला आहे. अपात्रता याचिका विधिमंडळ सदस्यच सादर करू शकतो, पक्षाच्या अध्यक्ष नव्हे, असा दावा प्रतिवाद्यांच्या वकिलांनी काल केला. याचिकेवर पुढील युक्तिवाद येत्या २३ रोजी होणार आहे.
याचिकादार कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांचे वकील अभिजित गोसावी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, प्रतिवाद्यांचा हा दावा खोडून काढताना आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा हवाला दिला आहे. या आदेशानुसार आमदाराविरुद्ध कोणीही सर्वसामान्य माणूसदेखील अपात्रता याचिका सादर करू शकतो.'
पाटकर यांनी सभापतींकडे सादर केलेली ही याचिका काँग्रेसमध्ये प्रत्यक्ष फूट पडण्यापूर्वीची आहे. गेल्या जुलैमध्ये विधानसभा अधिवेशन तोंडावर असताना कामत व लोबो यांनी काँग्रेसच्या इतर पाच आमदारांसह फुटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, दोन-तृतीयांश संख्याबळाची पूर्तता न झाल्याने फूट बारगळली. मात्र नंतर सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष फूट पडली आणि काँग्रेसचे आठ आमदारांनी विधिमंडळ गट भाजपत विलीन केला. जुलैमध्ये पाटकर यांनी सभापतींकडे वरील दोघांविरुद्ध ही अपात्रता याचिका सादर केली होती.
दरम्यान, कामत व लोबो यांच्या वतीने सभापतींसमोर युक्तिवाद केलेले अॅड. पराग राव म्हणाले की, काँग्रेसचे आमदार असताना पक्षाच्या अध्यक्षाला अपात्रता याचिका सादर करता येणार नाही, हा आमचा दावा होता. आमदार नसतील तरच अध्यक्ष अपात्रता याचिका सादर करू शकतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"