पणजी : गोव्याच्या विविध भागांमध्ये गेले किमान ५२ तास वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. वादळ येऊन गेले तरी, अनेक ठिकाणी वीज ट्रान्सफोर्मर मोडल्याने तसेच वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. वीज नाही म्हणून नळाला पाणीही नाही, अशी अत्यंत दयनीय स्थिती शेकडो गोमंतकीय कुटूंबांच्या वाट्याला गेल्या तीन दिवसांपासून आली आहे.
पणजीपासून अगदी जवळ असलेल्या मेरशी, सांताक्रुझ, व्हडलेभाट ताळगाव व अन्य ठिकाणी वीज पुरवठा शनिवारपासून बंद आहे. बार्देश, डिचोली, सत्तरी, पेडणे अशा तालुक्यांतील ग्रामीण भागातही तीन दिवस वीज नाही. आता पाणी पुरवठाही नाही. आमची मुले झोपत नाहीत, घरातील आजारी व वद्ध वडील किंवा आजोबांनाही खूप त्रास होत आहे, अशा प्रकारच्या तक्रारी लोक करत आहेत.
वीज नाही, पंखे बंद व पाणीही नाही अशावेळी कोविड संकट काळात लोकांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. वीज कर्मचाऱ्यांनी काही भागांमध्ये जलदगतीने काम केले व वीज पुरवठा सुरळीत केला. पर्वरीमध्ये ४८ तासांनंतर वीज पुरवठा सुरळीत झाला पण अनेक गावे व वाडे अजून अंधारात आहेत. वीज खात्याला मनुष्यबळ कमी पडत आहे. काही वीज कर्मचाऱ्यांना कोविड झाला आहे. त्यामुळे ते कामावर येऊ शकत नाहीत. काही भागांत तारांसकट पूर्ण वीज खांबच मोडून पडले आहेत.
तिसवाडीसह प्रत्येक तालुक्यातील लोक आपआपल्या आमदारांना व मंत्र्यांना फोन करून थकले आहेत. वीज खात्याचे अभियंते धावपळ करत आहेत पण लोकही हताश झाले आहेत. त्यांची सहनशीलता संपू लागली आहे. काही लोकांनी शहरी भागातील तसेच उपनगरातील आपले फ्लॅट सोडून अन्य भागांमध्ये (जिथे वीज आहे) तिथे सोमवारी स्थलांतर केले.