लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली/फोंडा : रेल्वे खात्यात तसेच इतर ठिकाणी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून डिचोलीसह विविध भागांतील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या प्रिया यादव या महिलेला डिचोली पोलिसांनी फुलेवाडी- कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतलेल्या दीपश्री सावंत-गावस हिलाही अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. काही दिवसांपासून ती पसार होती.
शनिवारी डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी येथील पोलिस स्थानकाचा ताबा घेताच धडक कारवाई करत कोल्हापूर येथून प्रिया यादव या महिलेला ताब्यात घेतले. प्रिया हिच्या विरोधात ऑगस्ट महिन्यात डिचोली पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ती डिचोलीतून गायब झाल्याने खळबळ माजली होती. या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल राहुल वेनजी याची चौकशी केल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. परंतु प्रिया यादव ही पसार होती.
१६ ऑगस्ट रोजी अनिकेत दलवाई (बोर्ड-डिचोली) यांनी डिचोली पोलिसांत तक्रार नोंदवली होती. तक्रारीत प्रिया यादव हिने २०२३ मध्ये आपल्या कोल्हापूर येथील २ जागा रेल्वे रुळासाठी जाणार असल्याने आपल्याला पाच नोकऱ्या मिळणार असल्याचे सांगून तुम्हाला सर्व पाचही नोकऱ्या देऊ, असे सांगितले. प्रत्येक पोस्टसाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार जुलै २३ मध्ये तिला दहा लाख रुपये दिले. तसेच कर्नाटक व पुणे येथील दोन जणांनी तिला पाच लाख रुपये दिले होते. अशाच प्रकारे वेगवेगळी कारणे सांगून तिने अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आल्यानंतर या सर्वांनी डिचोली पोलिस स्थानकात जमाव करून धडक दिली होती. पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन सदर महिलेला त्वरित अटक करून पैसे वसूल करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, ही कारवाई पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी व पोलिस निरीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश गाडेकर, विकेश हडफडकर, विशाल परब, स्मिता पोपकर यांच्या पथकाने केली.
'फसवणूक झाल्यास तत्काळ तक्रार नोंदवा'
सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे उकळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री सावंत यांनी अशा प्रकरणात प्रमोद फसलेल्या लोकांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रारी द्यावी, असे आवाहन केले आहे. सोमवारी पणजीत पत्रकारांशी बोलताना सावंत यांनी लोकांना न घाबरता पुढे येण्याचे व संबंधितांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले आहे. फसवणूक प्रकरणातील कोणालाही सोडले जाणार नाही, अशी प्रकरणे अतिशय गांभीर्याने घेतली आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नोकरभरती प्रक्रिया स्थगित करा : सरदेसाई
सरकारी नोकऱ्या विक्री प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करावी, तसेच सध्या जी नोक- रभरती प्रक्रिया करण्यात येत आहे ती तत्काळ स्थगित करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. नोकऱ्यांच्या भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा होत असल्याचे पूजा नाईक हिच्या अटकेनंतर स्पष्ट झाले आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्याल- यातील कनिष्ठ लिपिक पदाच्या नोकरभरतीत त्रुटी असल्याचे आपण सांगितले होते. ही नोकरीभरती स्थगित करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही आपण केली होती; परंतु या प्रकरणाकडे सरकारने दुर्लक्ष करत प्रक्रिया पुढे नेली आहे. या सर्व गोष्टींमुळे सरकारी नोकरी मिळवण्यास पात्र असणाऱ्या गोमंतकीय तरुणांवर अन्याय होत असल्याचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रियाचे प्रकरण वेगळे
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या नोकरभरती घोटाळा प्रकरणात प्रिया यादव हिचा कोणताही संबंध नाही, असे उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी स्पष्ट केले आहे. हे प्रकरण रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवण्याचा प्रकार आहे. मात्र, राज्यातील नोकरभरती व फसवणूक प्रकरणात तिचा संबंध नसल्याचे दळवी म्हणाले.
सागरला पुन्हा अटक
पैशांच्या बदल्यात नोकरी प्रकरणात पसार असलेल्या दीपश्री सावंत गावस हिला अटक केल्यानंतर काही तासातच पोलिसांनी पुन्हा एकदा पोलिस कॉन्स्टेबल सागर नाईक याला आणखी एका प्रकरणात अटक केली आहे. संदर्भात टोनीनगर-सावर्डे येथील सदानंद विठू विनौंडकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
दागिनेही जप्त
नोकरीच्या आमिषाने प्रियाने काही जणांकडून दागिने घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे दागिने गहाण ठेवून तिने कर्जही काढले आहे. अटकेनंतर तिच्याकडून ९ लाख रुपये किमतीचे ११६ ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच तिच्याकडे दोन कार व दोन दुचाकी असल्याचे तपासात समोर आले आहे.