काशिराम म्हांबरे, म्हापसा: म्हापशातील प्रथमवर्ग न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना उद्या २९ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी केला आहे. आज मंगळवारी हा आदेश न्यायालयाने दिला.
२०१७ साली निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी या समन्स बजावण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी कायदा आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १७१(अ) अंतर्गत उद्या सकाळी १० वाजता न्यायालयात हजर राहण्यास सांगितलेआहे. निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान येथील टॅक्सी स्थानकावर केजरीवाल यांच्या झालेल्या जाहीर सभेवेळी त्यांनी आपल्या भाषणातून मतदारांना प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून मतांच्या बदल्यात पैसे स्विकारणे आवाहन केले होते मात्र मत फक्त त्यांच्याच पक्षाला देण्याची सूचना केली होती.
त्यानंतर तत्कालीन निर्वाचन अधिकाºयाने त्यांच्या विरोधात म्हापसा पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली होती. तसेच न्यायालयानेपोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचेआदेशही त्यावेळी दिले होते. दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, त्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर होण्याच्या एक दिवस आधी मंगळवारी समन्स प्राप्त झाले आहेत. सदर प्रकरणात त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले अशीही माहिती त्यांनी दिली. बुधवारी आपण न्यायालयात हजर राहून या संबंधीची कागदपत्रे घेणार त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे पालयेकर म्हणाले.