म्हापसा : पारंपरिकता नष्ट झालेल्या म्हापसा बाजारपेठेतील पालिका मंडळ व व्यापारी संघटना यांच्यातील वाद शिगेला पोहोचला. पालिका मंडळाच्या कारभाराला कंटाळलेल्या व्यापारी संघटनेने बाजारा दिवशी अतिक्रमण करून बसलेल्या विक्रेत्यांना हटविले. तसेच पालिकेविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. बाजारपेठेत शिस्तीची मागणी करण्यासाठी व्यापारी संघटना व पालिका मंडळात गुरुवारी झालेली बैठक तोडग्याविना संपन्न झाली. त्यानंतर संघटनेने बाजारादिवशी शुक्रवारी दोन तास बाजार बंद ठेवून अतिक्रमण हटविण्याचा व पालिकेचा निषेध करण्याचा निर्णय घेतला.
आज बाजाराच्या दिवशी बाजाराला सुरुवात होताच अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी दाखल झालेल्या संघटनेला अनेक गैरप्रकार दिसून आले. बाजारपेठ फिरत्या विक्रेत्यांनी व्यापून गेलेली. त्यातील अनेकाजवळ पालिकेचे परवाने नव्हते. काही जण फूटपाथ, वाहने पार्क करण्याच्या जागेत तसेच रस्त्यावर बसले होते. मसाले वाल्याजवळ अन्न व औषधी प्रशासनाचा परवाना सुद्धा नव्हता. व्यापा-यांच्या व्यवसायावर परिणामकारक ठरलेल्या या फिरत्या विक्रेत्यांची अनेक गैरकृत्य समोर आली. काही विक्रेत्यांना संघटनेकडून हटवण्यात आले. त्यामुळे वातावरण बरेच तंग झाले होते. या कारवाईनंतर पालिकेविरोधात म्हापसा पोलीस स्थानकात संघटनेकडून लेखी तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी पालिकेचा निषेध केला. बेकायदेशीर कृत्याना पालिका पाठिंबा देत असल्याचा आरोप केला. बेकायदेशीर कृत्य लपवण्यासाठी शहर विक्रेत्यांची समिती स्थापन केली जात नसल्याचा आरोप करून संघटनेने सुरू केलेली मोहीम यापुढे सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तालुक्याचे मामलेदार पोलीस फौजफाट्यासह उपस्थित होते. मात्र पालिका मंडळातील एकही नगरसेवक उपस्थित नव्हता.