म्हापसा : आपल्या पारंपारिकतेसाठी गावातील विक्रेत्यांना गावठी वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जगप्रसिद्ध असलेला पोर्तुगीजकालीन म्हापशातील बाजार आता पारंपारिकते पासून दूर होवू लागला आहे. बाजारातील पारंपारिकतेची जागा अत्याधुनिकतेने घेतली असल्याचे शुक्रवारी व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनावरुन पुन्हा सिद्ध झाले आहे. पारंपारिक वस्तू विकणारे कमी व दुकानात मिळणारे वस्तू विकणारे जास्त प्रमाणात या बाजारात आढळून येऊ लागले आहे.
उत्तर गोव्यातील म्हापसा शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा बाजारात प्रवेश करताच तेथे असलेला शकुंतलेचा पुतळा स्वागतासाठी सज्ज असतो. बाजारात प्रवेशल्यावर त्यात मिळणाऱ्या पारंपारिक गावात पिकवल्या जाणाऱ्या तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ठ गावठी वस्तूसाठी जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे गावातील लोक आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी याच बाजारपेठेवर अवलंबून असतात. आजही अवलंबून आहेत. लोकही आपल्याला गरजेच्या असलेल्या वस्तू तसेच गोव्यातील इतर बाजारात विकत न मिळणाऱ्या वस्तू विकत घेण्यासाठी हमखास याच बाजारात येत असतात. गोव्यातील किनाऱ्याचा, इथल्या निसर्गाच्या, मंदिरे तसेच चर्चच्या आकर्षणाने येणारा पर्यटक या बाजाराला भेट दिल्याशिवाय इथून एखादी वस्तू विकत घेतल्या शिवाय जात नव्हता. विदेशी पर्यटकांसाठी तर हा बाजारात कुतूहलतेचा विषय बनलेला आहे. आज मात्र या बाजाराची स्थिती पूर्णपणे बदलून गेली आहे. बदललेल्या स्थितीमुळे पर्यटकांनी सुद्धा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. ती बदलून गेलेल्या बाजारातील मुळ संकल्पनेमुळे.
बाजारात मिळणाऱ्या पारंपारिक वस्तूंची पारंपारिक विक्रेत्यांची जागा आता इतर वस्तूंनी इतर विक्रेत्यांनी घेतली आहे. रेडिमेड कपड्यांच्या विक्रेत्यासोबत, चप्पल, बूट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, तसेच फळ विक्रेत्यांनी बाजारपेठेतील जागा व्यापून गेली आहे. त्यामुळे जागा मिळत नसल्याने पारंपारिक विक्रेते हळूहळू या बाजारापासून दूर जावू लागले आहेत. त्यांना बसून विक्री करण्यासाठी सुद्धा उपलब्ध असलेल्या जागेचे प्रमाणही कमी होत गेल्याने ते दूर होण्यामागचे प्रमुख कारण ठरले आहे. राज्या बाहेरुन ट्रक भरुन विक्रीसाठी आणले जाणारे सामानही बाजारातील इतर व्यवसायिकांवर परिणामकारक ठरले आहे.
बाजारात गावठी उकड्या तांदूळापासून, गावात पिकणारे हळसांडे, गावठी मिरची, गावठी भाज्या, गावात फुलणारी आबोली, शेवती सारख्या फुलांना, पाव, पोळी, काकण या सारखे बेकरीतील पदार्थ, त्याच बरोबर बिबींका, धोदोल तसेच या सारखे इतर अनेक पदार्थ बाजाराचे वैशिष्ठ आहे. गावातील लोक खास करुन वयोवृद्ध महिला बाजारात बसून त्याची विक्री करायची. किमान आठवड्याच्या बाजाराला तर त्यांची उपस्थिती असायची आज मात्र या महिलांना बसायला जागा मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे एकतर त्या मिळेल त्या ठिकाणी बसतात किंवा बाजाराला येण टाळतात.
बाजारातील पारंपारिकता नष्ट होण्याची अनेक कारणे मानली जातात. पालिकेकडून मासळी मार्केट, भाजी मार्केट, नव्या दुकानांचे बांधकाम, नवे गाळे बांधून बाजाराचा विस्तार करण्यात आला. विस्तार करताना विक्रेत्यांच्या मुलभूत सुविधांवर त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्यासाठी कोणतीही योजना अमलात आणली नाही. नवे प्रकल्प आल्यानंतर बाजारातील रस्ते मोकळे न होता त्यावर विक्रेत्यांनी कब्जा केला. या प्रकाराला पूर्णपणे पालिका मंडळ व तेथील अधिकारी जबाबदार आहेत. पारंपारिक विक्रेत्यांची जागा घेतलेल्या विक्रेत्यांना बाजारात समावून घेण्यासाठी नगरसेवकांचा वरदहस्त आहे. त्यांना वदरहस्त दिला नसता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती.
कुठल्याही बाजारासाठी आवश्यक असलेली शहर विक्रेत्यांची समिती पालिकेकडून स्थापन करण्यात आली नाही. 2014 साली या समितीची निवड करण्यात आलेली; पण चार वर्षानंतर ती अधिसुचीत करण्यात आलेली नाही. ही समिती स्थापन न होण्या मागे विद्यमान मंडळाचा त्यात हात तसेच त्यांचा स्वार्थ मानला जात आहे. बदलत असलेल्या या परिस्थितीवर वेळीस आवर घातला नाही तर हाता बाहेर जाण्याची शक्यता आहे.