म्हापसा - केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी लागू करण्याचा निर्णय म्हापसा पालिकेच्या घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच केली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी दिली.
स्ट्रॉ, प्लास्टिक कप तसेच प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी केली जाणार आहे. त्यानंतर कालांतराने त्यात इतर प्लास्टिक वस्तूंचा समावेश केला जाणार आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मासळी मार्केटात करणे त्रासदायी ठरू नये यासाठी मार्केटात असलेल्या एका स्वयंसेवी संघटनेच्या दुकानावर पर्यायी पिशव्या उपलब्ध करून देण्याचे ठरवण्यात आले आहे. जागृती करण्यासाठी शैक्षणिक संस्था, सभागृहे, धार्मिक स्थळे यांना पत्र पाठवून जागृती केली जाणार आहे.
म्हापशातील बाजारपेठेत पहाटे प्लास्टिकची विक्री करण्यासाठी ट्रक भरून पिशव्या आणून त्याचे वितरण केले जाते. त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत माजी नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी मांडले. तसेच बाजारात प्लास्टिकची विक्री करणाऱ्यांचे परवाने तपासणे गरजेचे असल्याचीही सुचना त्यांनी मांडली. असे केल्यास बंदी चांगल्या प्रकारे यशस्वी होईल असेही ते म्हणाले.
सिंगल यूज प्लास्टिकवर कायमची बंदी लागू करण्यासाठी म्हापसा पालिकेची विशेष बैठक नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बंदी लागू करताना प्लास्टिकच्या पर्यायावर जागृती करण्यावर भर देणे तसेच उत्तेजन देण्याचे उपक्रम हाती घेतले जाणार असल्याची माहिती ब्रागांझा यांनी दिली. पालिकेकडून यापूर्वी 50 मायक्रोनपेक्षा कमी दर्जाच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी लागू केली आहे. तसेच या पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तजवीज सुद्धा करण्यात आली आहे.
सदर ठरावावरील चर्चेच्या वेळी नगरसेवकांकडून अनेक सुचना मांडण्यात आल्या. माजी नगराध्यक्ष संदीप फळारी यांनी पुर्नवापर होणाऱ्या वस्तूंचा वापराला उत्तेजन देण्याची गरज व्यक्त केली. बंदी लागू करताना प्लास्टिकला असलेले पर्याय सुद्धा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. काही नगरसेवकांनी बंद प्लास्टिकातून विक्रीस येणाऱ्या खाद्य पदार्थांतील प्लास्टिकवर कशा प्रकारे बंदी लागू केली जाईल यावर स्पष्टीकरणाची मागणी केली. सुधीर कांदोळकर यांनी कॉर्पोरेटकडून त्यांच्या सामाजिक योजने अंतर्गत कमी दरात पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची मागणी केली.
मागील पाच वर्षांपासून प्लास्टिक बंदीवर फक्त चर्चा केली जात असून हव्या त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे मत तुषार टोपले म्हणाले. प्लास्टिकला पर्याय मोफत उपलब्ध करून देण्यापेक्षा लोकांना विकत घेवून त्याच्या वापरावर भर देण्याची मागणी केली. राजसिंग राणे यांनी बंदी कडकपणे लागू करण्यापेक्षा इतर गोष्टीवर भर देण्याची गरज व्यक्त केली. माजी नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी मासळी मार्केटात खाद्य पदार्थांची विक्री करणाºया स्वयं सेवी गटामार्फत पर्याय उपलब्ध करून देण्याची सुचना मांडली.