म्हापसा : बार्देशात काँग्रेस पक्षाची पुर्नबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 06:28 PM2019-02-14T18:28:00+5:302019-02-14T18:28:05+5:30

राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी बार्देस तालुक्याचे महत्त्व काँग्रेस पक्षाने ओळखल्याने तालुक्यातून गमावलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाला तालुक्यातून मजबूती देण्याचे तसेच पक्षबांधणीचे काम सध्या पक्षाकडून सुरू करण्यात आले आहे.

mapusa : Restoration of Congress Party in barde | म्हापसा : बार्देशात काँग्रेस पक्षाची पुर्नबांधणी

म्हापसा : बार्देशात काँग्रेस पक्षाची पुर्नबांधणी

Next

म्हापसा : राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी बार्देस तालुक्याचे महत्त्व काँग्रेस पक्षाने ओळखल्याने तालुक्यातून गमावलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाला तालुक्यातून मजबूती देण्याचे तसेच पक्षबांधणीचे काम सध्या पक्षाकडून सुरू करण्यात आले आहे. या कामाचा एक भाग म्हणून काही नेते पक्षात प्रवेश करण्याच्या मार्गावर असून काही नेत्यांना पक्षात आणण्यासाठी हालचालीसुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या या हालचालींचे परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपावर होण्याची संभावना निर्माण झाली आहे. 

राज्यातील मतदारसंघाची फेररचना होण्यापूर्वी 2007 सालच्या निवडणुकीत तालुक्यातील मतदारसंघाची संख्या एकूण सहा होती. त्यातील प्रत्येकी तीन मतदारसंघाची विभागणी समानरित्या काँग्रेस पक्षात आणि भाजपात झाली होती. फेररचनेनंतर 2012 सालच्या विधानसभा  निवडणुकीवेळी तालुक्यातील मतदारसंघांची संख्या सहा वरुन सात करण्यात आलेली. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत तालुक्यातून काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे सफाया झाला होता. राज्यात झालेल्या परिवर्तन लाटेतून काँग्रेसचे आमदार पराभूत झाले होते. सहा मतदारसंघात भाजपाला मतदारांनी साथ दिली होती तर पर्वरी हा एक मतदारसंघ अपक्ष आमदाराच्या ताब्यात गेला होता. तालुक्यातून काँग्रेसचे बालेकिल्ले समजल्या जाणा-या मतदार संघातून काँग्रेसचे सर्व तीनही आमदार पराभूत झाले होते. पक्षाची पूर्णपणे पिछेहाट झाली होती. 

या परिस्थितीतून मार्ग काढीत वाटचाल करणा-या काँग्रेस पक्षाने 2012 सालच्या निवडणुकीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे बरेच प्रयत्न केले; पण म्हणावे तसे यश या पक्षाला लाभू शकले नाही. 2017 च्या निवडणुकीत मतदारांनी तालुक्यातून भाजपा विरोधात कौल दिला असला तरी हा कौल काँग्रेस पक्षाच्या बाजूने नव्हता. सात मतदारसंघातून पक्षाचा फक्त एकच आमदार नीळकंठ हळर्णकरच्या रुपाने थिवी मतदारसंघातून निवडून आला होता. इतर सर्व मतदारसंघातून त्यांचे उमेदवार पराभूत झाले होते. तालुक्याचे नेतृत्व करणारा म्हणावा तसा नेता या पक्षाजवळ नसल्याने पक्षाला परिणामाला सामोरे जावे लागले होते. 

मागील दोन निवडणुकीतून उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पक्षात पुन्हा नवसंजीवनी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली सध्या जोरदार हालचाली सुरु झालेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही नेत्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश दिला जात असून पुढील काही दिवसात आणखीन काही नेते तालुक्यातून या पक्षात पक्षात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. 

एकेकाळी काँग्रेस पक्षात असलेले व नंतर हा पक्ष सोडून गेलेले ट्रोजन डिमेलो यांना काँग्रेस पक्षात पुन्हा समाविष्ठ करुन घेण्यात आले आहे. राज्यातील राजकारणात एकेकाळी आपले वर्चस्व गाजवणारे तसेच तालुक्यातील काही मतदारसंघावर अद्यापही प्रभाव असलेले माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. दयानंद नार्वेकर हे सुद्धा काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. या दोन नेत्यानंतर इतर काही नेते सुद्धा काँग्रेसीत प्रवेश करण्याच्या मार्गावर असून त्यांच्या प्रवेशानंतर पक्षात पुन्हा नवचैतन्य निर्माण होण्याची संभावना व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षाकडून सुरु करण्यात आलेल्या या हालचालींचा निश्चितपणे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपावर होण्याची शक्यता आहे. भाजपा विरोधात असलेल्या सर्व नेत्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: mapusa : Restoration of Congress Party in barde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.