फोंडा : बालनाट्य चळवळ व युवा नाट्य चळवळ अशा माध्यमातून नाट्य क्षेत्रात भरघोस योगदान देणारे ज्येष्ठ रंगकर्मी व हंस नाट्य ट्रेनिंग सेंटरचे मुख्य आधारस्तंभ विजयकुमार नाईक यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. फोंडा येथील स्मशानभूमीत संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २००३ मध्ये झालेल्या युवा मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर २००५ मध्ये झालेल्या गोमंतक मराठी नाट्य संमेलनाचेसुद्धा अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.
विजयकुमार नाईक यांनी हंस थिएटर ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून सुमारे १५० बालनाट्य कार्यशाळा, युवा वर्गासाठी १०० कार्यशाळा, खास मुलांसाठी कार्यशाळा त्यांनी घेतल्या. गोव्यातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात नाटक शिकवण्यासाठी त्यांनी भ्रमंती केली. देशभरातील नाट्य विषयक संमेलने, परिषदांना ते उपस्थित असायचे. त्यामुळे देशभरात त्यांचा चाहता वर्ग होता. शास्त्रोक्त पद्धतीने नाट्य विषयावरील पेपर सादरीकरण करणे ही त्यांची हातोटी होती. संहिता, दिग्दर्शन, प्रकाश योजना, वेशभूषा, ध्वनी संकलन, नेपथ्य अशा नाटकाच्या प्रत्येक विभागात त्यानी अमूल्य योगदान दिले आहे. नाईक यांनी विपूल लेखन केले आहे. आजवर त्यांनी २१ एकांकिका, २६ नाटके, १३ बालनाट्य, ५ एकल नाटक, १३ संवाद विरहित नाट्य व पाच नभोनाट्य लिहिली. त्यांच्या षटकोन व मुखवटे या दोन पुस्तकांना चार पुरस्कार मिळाले आहेत.
देशभरातील विविध संस्थांकडून त्यांचा गौरव झाला. राजस्थानचा निर्मोही नाट्य सन्मान, सोलापूरचा रंगसाधक पुरस्कार, मुंबईचा रंगकर्मी व वसंत सोमण पुरस्कार, पुणे चा प्रयोगकर्मी व रंगमेळ पुरस्कार, गोवा सरकारचा युवा सृजन पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला होता. नाईक यांनी गोवा आणि देशभरात १६३ नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांचे दीड हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. विजयकुमार ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटर हा नाट्य क्षेत्रात त्यांनी अनोखा प्रयोग केला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गोवा व महाराष्ट्रातून अनेक नाट्यकलकरांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.