वास्को: गोव्यातील नामावंत ज्येष्ठ तियात्र गायक तसेच विनोदी कलाकार मारसेलीनो नोरोन्हा (वय ६८) यांचे मंगळवारी (दि.१९) संध्याकाळी वास्कोत झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. मारसेलीनो ‘डीवो’ दुचाकीवरून भाजी मार्केट परिसरातील रस्त्यावरून जात असताना याच दिशेने जाणाऱ्या ट्रक ला बाजूने त्याच्या दुचाकीची धडक बसल्याने तो ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. मंगळवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास सदर भीषण अपघात घडला.
चिखली, दाबोळी भागातील मारसेलीनो यांची गोव्यातील नामावंत तियात्र गायक तसेच विनोदी कलाकार म्हणून ओळख आहे. संध्याकाळी भाजी मार्केट मधून सामानाची खरेदी केल्यानंतर मारसेलीनो आपल्या ‘डीवो’ दुचाकीने (क्र: जीए ०६ सी ३३००) घरी जाण्यासाठी निघाले होते. याच वेळी मुरगाव बंदरातून निघालेला ट्रक (क्र: जीए ०९ यूव्ह ३५६१) मारसेलीनो जात असलेल्या मार्गातून जात होता. ट्रक ने मारसेलीनो च्या दुचाकीला ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाजूने त्याच्या दुचाकीची धडक ट्रकवर बसल्याने तो रस्त्यावर पडून त्याचे डोके ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन तो जागीच ठार झाला.
अपघाताच्या वेळी मारसेलीन यांने हेल्मेट घातले होते अशी माहीती येथे उपस्थित काही नागरीकांनी दिली. वास्को पोलीसांना अपघाताची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केल्यानंतर मारसेलीनो याचा मृतदेह शवगृहात पाठवून दिला. अपघात घडल्याचे ट्रक चालकाला समजताच त्यांनी प्रथम घटनास्थळावरून पोबारा काढला अशी माहीती सूत्रांनी देऊन नंतर त्याला पोलीस स्थानकावर आणण्यात आले.
मंगळवारी ट्रकखाली सापडून दुर्देवी रित्या मरण पोचलेला मारसेलीनो गोव्यातील नामावंत ज्येष्ठ तियात्र कलाकार असून या क्षेत्रात त्यांना सर्वजण ‘मारसेलींन दी बेती’ ह्या नावाने ओळखतात. त्यांनी अनेक तियात्रामध्ये काम केले असून गोव्यातील तियात्र प्रेमीबरोबरच मुंबई, दुबई अशा विविध राष्ट्रीय - अंतरराष्ट्रीय भागामध्ये सुद्धा तियात्र प्रेमींचे मन जिंकलेले आहे. ते ६८ वर्षाचे असले तरीसुद्धा तियात्रांमध्ये उत्तम काम करत असून त्यांच्या अशा अपघाती निधनामुळे तियात्र क्षेत्राने एक उत्तम कलाकार गमावलेला असल्याची प्रतिक्रीया काही तियात्र प्रेमींनी व्यक्त केली. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रज्योती देसाई सदर अपघात प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.