मडगाव: मडगाव जवळ असलेल्या आर्लेंम या भागातील मशिदी जवळच्या डोंगराळ भागात आतापर्यंत 21 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा भाग जिल्हाधिकाऱ्यांनी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला असून या भागातील लोकांच्या व्यापक चाचण्या हातात घेण्यास सांगितले आहे. शुक्रवारी या चाचण्यांना सुरवात झाली.
दक्षिण गोव्यातील हा सातवा कंटेन्मेंट झोन असून या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी जाण्याच्या सर्व वाटा बंद केल्या आहेत. ज्या वस्तीत हा कोरोना फैलावलेला आहे ती बहुतांश मजुरांची वस्ती असून यातील बहुतेक लोक मडगावच्या मासळी मार्केटात काम करतात तर काही जण मजूर म्हणून काम करतात.
बुधवारी या भागात 4 व्यक्ती बाधित आढळून आल्यावर इतरांच्या चाचण्या हाती घेतल्या असता गुरुवारी आणखी 17 नवीन रुग्ण आढळून आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी मशिदी पासून व्हाईट हाउस ओपन एअर हॉल पर्यंतचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्याचा आदेश रात्री उशिरा जारी केला.
आतापर्यंत दक्षिण गोव्यात मांगोरहिल, कुडतरी, झुवारीनगर, मोतीडोंगर, बोमडामळ- फातरपा, आणि उसगाव गांजे हे भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहेत.