लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: मंगळवारी साजरा होत असलेल्या दसऱ्यानिमित्त बाजारात उलाढाल वाढली आहे. खरेदीसाठी लोकांची गर्दी झाल्याचे दिसून आले.
दसऱ्याला झेंडूच्या फुलांची मोठी मागणी असल्याने रविवारी (दि. २२) वाक आणि इतर बाजारात तसेच रस्त्याकडेला झेंडू फुले मोठ्या प्रमाणावर विक्रीस आल्याचे दिसून आले. झेंडूची फुले १०० रुपये किलो या दराने विक्रीस असून हार ५० रुपये मिटरने मिळत आहे.
दसऱ्याला वाहन पूजा, शस्त्र पूजा, घराला तोरण बांधायला आणि इतर पूजेसाठी झेंडू फुलांची दरवर्षी मोठी मागणी असते. रविवारी बाजारात, मुरगाव पालिकेशेजारील पदपथावर, विविध ठिकाणी रस्त्याकडेला व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू फुले आणल्याचे दिसून आले. कर्नाटक, महाराष्ट्रातून झेंडू फुले विकण्यासाठी आणल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून मिळाली. छोट्या फुलांचा हार प्रती मीटर ३० रुपये तर मोठ्या फुलांचा हार ५० रुपये मीटर आहे. छोटी फुले ६० रुपये आणि मोठी फुले ८० ते १०० रुपये किलो दराने विकली जात होती.