म्हापसा: जगप्रसिद्ध अशा म्हापसा बाजारपेठेतील फिरत्या विक्रेत्यांवर शिस्त आणण्यासाठी पालिकेला अपयश आल्याचा आरोप करुन व्यापारी संघटना आपला व्यवसाय दोन तास बंद करुन शुक्रवारी बाजाराच्या दिवशी विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आहे.
बाजारपेठेत वाढत्या फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यास पालिकेला अपयश आल्याचा आरोप म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी केला. वाढत्या विक्रेत्यांमुळे आपल्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे ते म्हणाले. चतुर्थी सणाच्या काळात तर व्यावसायिकांना या विक्रेत्यांमुळे मोठा फटका बसल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. सध्या दिवाळीचा सण तोंडावर आल्याने या सणाला सुद्धा त्यांना परिणाम भोगावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेत जावून नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांची भेट घेतली व त्यांच्या समोर त्यांच्या समस्या मांडल्या. सुमारे तासभर झालेल्या चर्चेच्या अंती ठोस असे आश्वासन शिष्टमंडळाला मिळू न शकल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
नव्या पालिका मंडळाची स्थापना झाल्या पासून मागील तीन वर्षात संघटनेने त्यांच्या अनेक समस्या पालिकेसमोर मांडल्या. त्यातील एकही समस्येवर तोडगा काढण्यास पालिकेला अपयश आल्याने हे पावूल उचलणे संघटनेला भाग पडल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता स्वत: बाजारात जावून कारवाई केली जाणार असून त्यानंतर पुढील कृतीस पालिकाच जबाबदार राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. १५ आॅगस्ट रोजी संघटनेने म्हापशात याच प्रश्नावरुन लाक्षणीक असे आंदोलनही केले होते.
अद्यापही पालिकेकडून विक्रेत्यांची समिती स्थापन केली नाही. बाजारातील कर गोळा करणारा कंत्राटदार आपली मनमानी करीत असल्याने त्याचे परिणाम व्यापाºयांना भोगावे लागतात. कंत्राटदार तसेच पालिकेतल्या काही कर्मचाºयांची हातमिळवणी झाली असल्याने हा प्रकार घडत असल्याचे शिरोडकर म्हणाले. पोलिसांकडून सुद्धा कारवाईची चालढकल केली जात असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान भेटी दरम्यान शिष्टमंडळाने मांडलेल्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आश्वासन नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी दिले. कर्मचारी वर्गाचा असलेला अभाव तसेच काही कर्मचाºयांवर निवडणुकीचे काम सोपवण्यात आले असल्याचे कारवाई करण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे ब्रागांझा यांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्यांनी दिलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने बाजारपेठ दोन तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.