पणजी : सिंधुदुर्गमधून जी मासळी गोव्यात येते, त्या मासळीसाठी पेडणे येथे घाऊक मासळीचा बाजार सुरू करता येईल, अशा प्रकारची चर्चा महाराष्ट्राचे गृहनिर्माण राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालक मंत्री दिपक केसरकर आणि गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यातील बैठकीवेळी सोमवारी झाली.
बैठकीला आरोग्य सचिव अशोककुमार हेही उपस्थित होते. मंत्री राणे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले, की सिंधुदुर्गमधील मासळीप्रश्नी चर्चेसाठीच केसरकर माझ्याकडे आले होते. त्यांनी पेडण्यात घाऊक मासळी बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. आपल्याही तो प्रस्ताव चांगला वाटला. गोवा सरकार या विषयात लक्ष घालेल. कारण घाऊक मासळी बाजार सुरू करण्यास महाराष्ट्र राज्य खर्च करेल, असे केसरकर यांनी सांगितले आहे. इन्सुलेटेड बॉक्समधून मासळी आणावी, अशी आमची भूमिका आहे. अन्न सुरक्षा कायद्यालाही तसेच अपेक्षित आहे. इनसुलेटेड बॉक्सची व्यवस्था महाराष्ट्र करील. सिंधुदुर्गच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारीही लवकरच आपल्या भेटीसाठी येणार आहेत. त्यांच्याशी पुढील चर्चा करून गोवा सरकार निर्णय घेईल.
दरम्यान, कारवार व सिंधुदुर्गमधील छोट्या मासळी व्यवसायिकांसाठी गोव्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी झालेला नाही. काही मोठे ट्रेडर्स अगोदरच प्रस्तावित शिथिलतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. सध्या सिंधुदुर्ग, कारवारची मासळी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात येते. त्या मासळीची तपासणी करण्याचे काम गोव्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिकारी आयवा फर्नाडिस ह्या आज मंगळवारपासून करतील. लोकांमधील फॉर्मेलिनचा संशय दूर करण्याच आमचा प्रयत्न आहे, असे मंत्री राणे म्हणाले.