लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : माशेल महिला को-ऑप. क्रेडिट सोसायटीमधील १८ कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
सहकारमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, संचालक मंडळ तेवढेच जबाबदार आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना डिसेंबर २०२४ पर्यंत पैसे वसूल करण्याची मुदत दिली असून, चौकशी अधिकारीही नियुक्त केलेले आहेत. तर या भागाचे आमदार तथा कला सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे म्हणाले की, 'राज्यात मोठ्या प्रमाणात बहुराज्य बँका येत आहेत. लोकांनी व्याजाला भुलून गुंतवणूक करू नये. मी कोणत्याही बँकेला परवानगी दिलेली नाही. सरकारने मल्टिस्टेट बँकांची आर्थिक पार्श्वभूमी तपासायला हवी.
दरम्यान, माशेल महिला को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने ठेवीदारांची १८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे, असा आरोप गुरुवारी संस्थेच्या ठेवीदारांनी केला होता. आमचे पैसे पतसंस्थेने परत करावेत, अशी मागणी ठेवीदारांनी पणजीतील आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेऊन केली होती. सरकारने पतसंस्थेच्या कामकाजाची कायदेशीर चौकशी करून आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला परत मिळवून द्यावेत, अशी मागणी ठेवीदारांची होती. संस्थेचे अध्यक्ष, तसेच पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी आपल्या नातेवाइकांना, जवळच्या लोकांना मिळेल तसे कर्ज दिले. या कर्जाची परतफेड झालेली नाही. आता आम्ही पैशांसाठी हेलपाटे मारत आहोत असा आरोप ठेवीदारांनी केला होता. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाचा फलक झळकवत महिला ठेवीदारांनी आंदोलन केले. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. सुमारे ५०० हून अधिक ठेवीदारांचे सुमारे १८ कोटी रुपये संस्थेत अडकले आहेत.