पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका फटक्यात शुक्रवारी कोकणी साहित्य आणि भाषा सेवेसाठीचे एकूण 32 पुरस्कार रद्द केल्यानंतर नेटीझन्सनी सोशल मिडियावर तो मोठ्या चर्चेचा विषय बनवला आहे. गोव्यातील कोंकणी आणि मराठीप्रेमींमध्ये तर उलटसुलट प्रतिक्रीयांची मोठी लाट आली आहे.
पर्रीकरांचा निर्णय गोव्यात फार चर्चेचा विषय ठरण्यामागे सध्या एका मोठ्या वादाची पार्श्वभूमी आहे. उच्चवर्णीय विरूद्ध बहुजन असे टोक या वादाने गोव्यात गाठले. गोव्यासह महाराष्ट्रात परिचित असलेले साहित्यिक विष्णू वाघ यांनी कोंकणीत सुदिरसुक्त हा कवितासंग्रह लिहिला. या कवितासंग्रहाला कोकणी अकादमीने पुरस्कार देणे निश्चित केले होते. उच्चवर्णीयांविरुद्ध आसूड ओढले गेले आहेत असा आक्षेप घेऊन काही कोकणी लेखक तसेच अन्य कोकणीप्रेमीनी याविरुद्ध चळवळ सुरू केली. सगळीकडून व विशेषत: सोशल मिडियावरून टीका सुरू झाली. मात्र वाघ यांचे चाहते असलेल्या मराठीप्रेमींनी वाघ यांना पुरस्कार मिळायला हवा अशी भूमिका घेतली. यात देवीदास आमोणकर, रोहिदास शिरोडकर, प्रदीप घाडी आमोणकर आदींचा समावेश आहे. कोकणी अकादमीने वाघ यांच्या पुस्तकासह एकूण 32 पुस्तकांना पुरस्कार देणे निश्चित केले होते. मुख्यमंत्र्यांनी वाघ यांचा पुरस्कार रद्द करण्याच्या प्रयत्नात सर्व 32 पुरस्कार रद्द केले. यामुळे कोकणी व मराठीप्रेमींमधील नेटीझन्सनी सोशल मिडियावरून पुन्हा सरकारवर टीका सुरू केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी फक्त वाघ यांचा पुरस्कार रद्द करायला हवा होता पण त्यानी सगळेच पुरस्कार रद्द केले हे कोकणी साहित्य व संस्कृतीच्यादृष्टीने चांगले घडले नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कवी व विचारवंत उदय भेंब्रे यानी व्यक्त केली आहे. सर्व पुरस्कार रद्द करणे हे धक्कादायक आहे असे कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष चेतन आचार्य यांनी लोकमतला सांगितले. कोकणी कवी परेश कामत यांनी मात्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले. पुरस्कारांची सारी निवड प्रक्रिया सदोष होती व त्यामुळे मुख्यमंत्री पर्रीकरांनी केले ते ठीकच असे देखील मत काहीजण व्यक्त करत आहेत.....