मडगाव: बदललेल्या पावसाच्या पॅटर्नचा फटका दक्षिण गोव्यातील किनारपट्ट्यानांही बसलेला असून सासष्टीच्या पट्ट्यातील किनारपट्टीचा बराच मोठा भाग समुद्राने आपल्या पोटात ओढून घेयल्याचे दिसून येऊ लागले आहे. यासंबंधी स्थानिक मच्छिमारांना विचारल्यास , पावसात किनारपट्टी खचून जाणे हे जरी नित्याचे असले तरी यंदा हे प्रमाण बरेच मोठे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सध्या समुद्राच्या लाटा जोरात किनाऱ्यावर येऊन धडकू लागल्या असून त्यामुळे कोलवा, बाणावली, वारका या भागात किनारपट्टी बऱ्याच प्रमाणात खचून गेली आहे. या किनारपट्टीवरील झाडेही त्यामुळे उन्मळून पडू लागली आहेत. या किनाऱ्यावरील किमान 20 टक्के झाडी समुद्राच्या उदरात गेली असावी असा अंदाज स्थानिक मच्छिमारांनी व्यक्त केला. यावेळी बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुरुची झाडे आणि माड कोसळून पडण्याच्या घटना घडल्याचे या मच्छिमारांनी सांगितले. पर्यटन व्यावसायिकांनी वाळूचे पट्टे कापून टाकल्यामुळेही किनारपट्टीची धूप अधिकच वाढल्याचे त्यांनी सांगितले