म्हापसा - म्हापसा येथील बाजारपेठेत असलेल्या म्हापसा बाजार या प्रसिद्ध ग्राहक बाजाराला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये 15 लाखांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
आगीत बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या कडधान्यासोबत इतर ग्राहकपयोगी सामान जळाल्याने नुकसान झाले. तसेच बाजारात असलेले 7 संगणक व दोन एसी जळाल्याची माहिती दलाने दिली. आगीत छप्पराचे सुद्धा नुकसान झाले. आगीत सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले असले तरी 50 लाखांचा माल वाचवण्यात दलाला यश आले आहे.
आग विझवण्यासाठी दोन बंबाचा वापर करण्यात आला. सुमारे दीड तासाच्या अथक मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. म्हापसा बाजार बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी आहे. तसेच बाजारात दिवसभर लोकांची सततची वर्दळ सुरुच असते. शॉटसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.