लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : शहराच्या विकासासाठी मास्टर प्लॅन हा महत्त्वाचा असतो. विकास हा एकाच पद्धतीने होत नसतो. वेगवेगळ्या विचारधारा घेऊन परिस्थितीचा आढावा घेऊन, लोकांना काय हवे, काय नको, ते पाहूनच आवश्यकतेनुसार मास्टर प्लॅन तयार केला जातो. हाच उद्देश समोर ठेवून मडगावसह इतर तीन शहरांचाही मास्टर प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. मास्टर प्लॅन तयार झाल्याने शहराचा विकास त्या दिशेने करता येतो, असे नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले.
मडगावात नूतनीकरण केलेल्या आनाफोंत गार्डन व म्युझिकल फाउंटनचे उद्घाटन मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला गोवा वनव्यवस्थापन महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे, आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामू शिरोडकर, नगरसेवक सगुण नाईक, प्रमुख वनपाल उमाकांत, मुख्य वनपाल प्रवीणकुमार राघव, अॅड. माधव बांदोडकर उपस्थित होते.
मंत्री राणे पुढे म्हणाले, मडगावचा विकास झालेला आहे. त्यामुळे लोकांच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत. आनाफोंत गार्डनची देखभाल पुढील तीन वर्षांसाठी जीसुडामार्फत केली जाईल. नीति आयोगाच्या सूचनेनुसार व कलमानुसार दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाईल, त्यामुळे गोमंतकीय युवक, युवतींना वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी प्राप्त होईल.
आपण मडगाव शहराचा भरीव विकास केला आहे. त्यापेक्षा जास्त विकास करण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. स्टुडिओ पेंड या कंपनीने मडगावचा मास्टर प्लॅन तयार केला आहे, ती नावाजलेली कंपनी आहे. संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.
वनांमध्ये जाऊन निसर्ग पाहण्याची संधी मिळणार
गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष व आमदार डॉ. दिव्या राणे म्हणाल्या, गोव्यातील सर्व धबधब्यांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील रानांचा विकासही केला जाणार आहे. त्यामुळे गोमंतकीयांना व पर्यटकांना रानांमध्ये जाऊन तेथील निसर्ग पाहण्याची संधी प्राप्त होईल. राज्यात निसर्ग पर्यटनात वाढ होणार आहे. उद्घाटनानंतर संगीतकार अशोक पत्की व संगीतकार, गायक अवधूत गुप्ते यांचा गीतांचा कार्यक्रम झाला.