काँग्रेसच्या निष्ठेच्या गोष्टी; इच्छूक उमेदवारांच्या धाडसाचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2024 10:25 AM2024-01-31T10:25:24+5:302024-01-31T10:26:11+5:30

निष्ठेच्या गोष्टी आता चक्क काँग्रेसचे आमदार सांगू लागले आहेत.

matters of congress loyalty and goa politics | काँग्रेसच्या निष्ठेच्या गोष्टी; इच्छूक उमेदवारांच्या धाडसाचे कौतुक

काँग्रेसच्या निष्ठेच्या गोष्टी; इच्छूक उमेदवारांच्या धाडसाचे कौतुक

निष्ठेच्या गोष्टी आता चक्क काँग्रेसचे आमदार सांगू लागले आहेत. देवासमोर शपथ घेणारेही खूप निष्ठावान होते, पणजीतील मंदिरात आणि बांबोळीच्या खुर्सासमोर उभे राहून मायकल लोबो, दिगंबर कामत, संकल्प आमोणकर वगैरे अनेकांनी गोंयकारांना शब्द दिला होता. सगळ्यांनी भाजपमध्ये उडी टाकली. जे भाजपमध्ये गेले नाहीत, त्यांच्याविषयी अधूनमधून अफवा पिकतात. आता लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. अशावेळी काँग्रेसने व काँग्रेसच्या आमदारांनी निष्ठेच्या गोष्टी सांगायलाच हव्यात. मात्र, त्याचबरोबर मतदारांकडे मते मागायला जाताना काँग्रेस पक्षाला आपले आमदार पक्ष सोडून का जातात तेही लोकांना नव्याने सांगावे लागेल. पूर्वी काही प्रदेशाध्यक्ष अशा फुटींबाबत माफी वगैरे मागायचे, आता माफी मागण्याची गरज नाही. मात्र, निदान फुटिरांना पुन्हा कधी काँग्रेस पक्ष आपल्या पक्षात फेरप्रवेश देणार नाही, हे तरी जाहीर करावे लागेल.

हळदोण्याचे आमदार कार्लस फरैरा हे काल पक्षनिष्ठेविषयी बोलले. कार्ल्सचे विधानसभेतील काम प्रभावी आहे. कायद्याचा चांगला अभ्यास असल्याने ते विधानसभा अधिवेशनात मुद्देसूद बोलतात, कार्लस काल म्हणाले, मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. तसेच मला पूर्ण विश्वास आहे, माझे अन्य दोन आमदारदेखील काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ आहेत. कार्लसचे हे विधान तसे मजेशीर आहे. अर्थात कार्ल्सच्या निष्ठेविषयी शंका नाही. मात्र, इतर आमदारांच्या निष्ठेविषयी ते का बरे बोलतात, असा प्रश्न लोकांना पडेलच. आजच्या राजकारणात आपण दुसऱ्याविषयी अत्यंत विश्वासाने व खात्रीने बोलू शकतो का? 

राहुल गांधीदेखील कधी कोणत्याच काँग्रेस आमदाराविषयी खात्रीने कुठे बोलत नाहीत, कार्ल्सना भाजपची आता ऑफर नाही, भाजपमध्ये आता अन्य आयात आमदारांना देण्यासाठीही काही नाही. बिचारे जे आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर्षी आले, त्यांच्यापैकी काहीजण सैरभैर होऊन फिरतात. मुख्यमंत्री सावंत यांनी आम्हाला काहीच दिले नाही, मोठे महामंडळ नाही व मंत्रिपदही नाही, असे काही आमदार सांगतात. फक्त सांताक्रूझचे रुदोल्फ तेवढे खुश आहेत. कारण रुदोल्फना एकट्यालाच काँग्रेस सोडून जाताना मोठे बक्षीस मिळाले होते.

काँग्रेसचे आठ आमदार एकत्र फुटले होते तेव्हा हळदोणेच्या आमदारालाही भाजपची ऑफर होती. नुवेचे आलेक्स सिक्वेरा फुटण्यापूर्वी कार्नुस यांना मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये येण्याचा सल्ला दिला होता. कदाचित कार्लस कायदा मंत्रीही झाले असते, पण कार्लस भाजपमध्ये गेले नाहीत. याबाबत कार्लसचे कौतुक करावे लागेल. कार्ल्सने म्हापशात काँग्रेस कार्यकर्त्यांना निष्ठेच्या चार गोष्टी सांगितल्या हे तसे चुकीचे नाही; पण काही कार्यकर्तेही आता पक्ष निष्ठेशी आपले काही नाते ठेवत नसतात. 

आमदार दुसऱ्या पक्षात गेला की त्याचे कार्यकर्ते व काही पदाधिकारीही दुसन्या पक्षात उडी टाकतात. सध्या रामभक्तीची लाट देशात आहेच, राम एकनिष्ठ होते. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते, काँग्रेसचेही काही नेते सध्या रामभक्त बनलेत, रमाकांत खलपदेखील रामभक्तीच्याच गोष्टी काहीवेळा सोशल मीडियावरून शेअर करतात, शुभेच्छा देतात. खलपांनाही कदाचित रामांचा एकनिष्ठ हा गुण आवडला असेल, तर विषय होता कार्लस फरैरांचा, कार्लस कधी काँग्रेस सोडणार नाही हे लोकांना पटते. वास्तविक काँग्रेसने तिकीट दिल्यानेच कार्लस आमदार होऊ शकले, हेदेखील लक्षात घ्यावे लागेल. कार्लस यांची इमेजपूर्वी भाटकार अशी होती. आता ती तशी नाही, त्यांना राजकीय नेत्यांप्रमाणेच लोकांमध्ये कायम मिसळावे लागेल. सध्या काँग्रेसचे काही पदाधिकारी लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाच्या स्पर्धेत आहेत. विजय भिके, राजन घाटे वगैरे लोकसभा निवडणुकीचे तिकीट मागतात, खलपांनीही तिकिटावर दावा केला आहे. 

काँग्रेसच्या सर्वच इच्छुक उमेदवारांच्या धाडसाचे मात्र कौतुक करावे लागेल. प्रत्येकाला वाटतेय की, आपण उत्तर गोव्यात जिंकणारच. पंचवीस वर्षे उत्तरेत भाजप जिंकत आला तरी आता मात्र काँग्रेस पक्ष इतिहास घडवील असे भिके, घाटे वगैरेंना वाटते हे आजच्या काळात मोठ्या धाडसाचे नव्हे काय? कार्लसने युरी आलेमाव व एल्टन यांच्या निष्ठेवरही खूप विश्वास ठेवला आहे. एल्टनना मध्यंतरी भाजपवाल्यांच्या ऑफर्स यायच्या; पण विजय सरदेसाई यांनी एल्टनना कधी कुठे जाऊ दिले नाही. शिवाय सरकारमधील एका राजकारण्यानेही एल्टनना रोखले होते. असो. तूर्त काँग्रेसचे तिन्ही आमदार पक्षावर निष्ठा ठेवून आहेत हेही नसे थोडके.
 

Web Title: matters of congress loyalty and goa politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.